आता ‘या’वेळेत होणार मतदान
प्रतिनिधी/ बेळगाव
येत्या 17 एप्रिल रोजी होणाऱया पोटनिवडणूकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. मतदानाची वेळ 12 तासांची करण्यात आली असून कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
यावेळी मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनची संख्या देखील वाढणार आहे. यासह मतदान केंद्रांची संख्या वाढल्यामुळे मतदान केंद्रावरील कर्मचाऱयांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
मतदानाची वेळ वाढविल्यामुळे मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱयांवरील ताण वाढला आहे. या निवडणूकीत मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक कर्मचाऱयांना ही माहिती देण्यात आली.
या निवडणूकीत निवडणूक कर्मचाऱयांना त्यांची नियुक्ती असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र त्या कर्मचाऱयांकडे इलेक्शन डुय़टी सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे.
याशिवाय मतदान करण्यासाठी जाणाऱया नागरिकांना कोविड नियमांचे पालन करणे अत्यावश्यक व बंधनकारक असणार आहे. सुरक्षितता, सामाजिक अंतर आणि मास्क परिधान करणे आवश्यक असून मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध सूचनाही देण्यात आल्या आहेत.