वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किर्गीझस्तानमधील बिश्केक येथे सुरू असलेल्या आशिया ओशेनिया ऑलिम्पिक पात्रता ज्युडो स्पर्धेतून भारताच्या 12 सदस्यीय संघाने माघार घेतली आहे. अजय यादव व रितू या भारताच्या दोन ज्युडोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.
अजय यादव 73 किलो तर रितू 52 किलो गटातील ज्युडोका असून किर्गीझस्तानमध्ये दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या दुसऱया चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले. मात्र ते लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात आले. भारतीय पथकाच्या ऑलिम्पिक मोहिमेला कोरोनामुळे धक्का बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या चाचणीत सर्व 12 ज्युडोका व चार प्रशिक्षक निगेटिव्ह आले होते. सध्या 16 सदस्यीय भारतीय पथक बिश्केकमधील हॉटेलात क्वारंटाईनमध्ये आहे. ‘किर्गीझस्तानमध्ये 4 एप्रिल रोजी दाखल झाल्यानंतर पहिली चाचणी घेण्यात आली आणि त्यात आम्ही सर्वजण निगेटिव्ह आलो होतो. पण स्पर्धा सुरू होण्याआधी 5 एप्रिल रोजी घेतलेल्या दुसऱया चाचणीत मात्र त्यापैकी दोघेजण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. अजय व रितू यांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. सध्या ते आपापल्या रूममध्ये आयसोलेट झाले आहेत. त्यांचे मनोबल अजिबात कमी झालेले नाही. मात्र त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सतत फोनवरून त्यांच्या संपर्कात आहोत,’ असेही संघाचे प्रशिक्षक जीवन शर्मा यांनी सांगितले.
आशिया ओशेनिया चॅम्पियनशिप स्पर्धा मंगळवारी सुरू झाली असून शनिवारी त्याची सांगता होणार आहे. स्पर्धेच्या नियमानुसार एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर संपूर्ण संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागते. भारतीय संघात सुशीला देवी (महिला, 4<8 किलो), तुलिका मान (महिला, 78 किलो), जसलीन सिंग सैनी (पुरुष, 66 किलो), अवतार सिंग (पुरुष, 100 किलो गट) या नामवंत ज्युडोकांचा समावेश आहे. या विभागातून एक ऑलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी हे चौघेही प्रयत्न करणार होते. जे निगेटिव्ह आहेत, त्यांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू असून यासंदर्भात भारतीय क्रीडा प्राधिकरणाने बिश्केकमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आहे.









