पुरवठ्याअभावी लसीचा तुटवडा
प्रतिनिधी / चिपळूण
राज्यस्तरावरून कोरोना लसीचा पुरवठा कमी झाल्याने जिल्हय़ात लसीचा तुटवडा भासत आहे. 7 एप्रिलपर्यंत काही मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होणार आहे. लस उपलब्ध न झाल्यास 8 एप्रिलपासून लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍपमध्येही बदल करण्यात आले आहेत. यामुळे केवळ 45 वर्षावरील नागरिकांना पुढील काही दिवस लस दिली जाणार आहे.
काही महिन्यांपासून जिह्यात कोरोना लसीकरण सुरु आहे. सुरूवातीला फ्रंट वर्कर्सना डोस देण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शिक्षक व 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण वाढत असताना नागरिकही मोठया संख्येने लसीकरणाला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे लसीकरणाची केंद्रे वाढवण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहे. असे असताना लसीचा पुरवठाच नसल्याने नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या जिल्हय़ात 7 एप्रिलपर्यंत काही मोजक्याच केंदावर लसीकरण होईल इतका साठा उपलब्ध आहे. लस उपलब्ध न झाल्यास 8 एप्रिलपासून लसीकरण पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे. लसीचा तुटवडा असल्याने पुढील काही दिवस केवळ 45 वर्षावरील नागरिकांनाच लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लसीकरणासाठी असलेले ऍपही बदलण्यात आले आहे. त्यामध्ये फक्त 45 वर्षावरील नागरिकांचीच नोंदणी होत असून त्यांनाच पुढील काही दिवस लस दिली जाणार आहे.









