ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतून 4 मार्चला प्रक्षेपित करण्यात आलेले ‘स्पेसएक्स’ रॉकेट अपघातग्रस्त झाले आहे. या रॉकेटचा एक भाग वॉशिंग्टनमधील शेतात पडला. शास्त्रज्ञांच्या पथकाने रॉकेटचा हा भाग ताब्यात घेतला असून, तांत्रिक बिघाडांमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वॉशिंग्टनमधील ग्रँट काउंटीमध्ये 2 एप्रिल रोजी पडलेल्या ‘स्पेसएक्स’च्या ‘फाल्कन-9’ रॉकेटचा भाग संमिश्र ओव्हर-रॅप ऑपरेशन जहाज म्हणून ओळखला जातो. फाल्कन-9 हा रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचा पुढचा भाग आहे.
ग्रँट काउंटी शेरिफ कार्यालयाने ट्विट केले की, ‘गेल्या आठवड्यात फाल्कन रॉकेटचा सीओपीव्ही एका शेतात पडल्याने तो ताब्यात घेण्यात आला. आम्ही रॉकेटचा हा भाग स्पेसएक्सच्या शास्त्रज्ञांना सुपूर्द केला आहे. ज्या व्यक्तीच्या शेतात हा भाग पडला त्याचे नाव उघड होणार नाही. जिथे हा भाग पडला त्या भोवती मोठ्या संख्येने लोक राहतात. रॉकेटची दिशा थोडी फार इकडे तिकडे असती तर तेथील लोकांना दुखापत झाली असती.’