नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या पाच विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे. तर तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीत एकाच टप्प्यात आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. जनतेसोबतच अनेक दिग्गजांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी चेन्नईत मतदान केले. यावेळी त्यांच्या मुली श्रुती हसन आणि अक्षरा हसन यांनीदेखील रांगा लावून मतदान केले.
यासोबतच अभिनेते रजनीकांत यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.
तसेच शिवगंगा जिल्ह्यात ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मतदान केले.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील कुन्नूर इथे मतदानाचा हक्क बजावला.
तसेच गुवाहाटीच्या अमिनगाव इथल्या मतदान केंद्रावर आसामचे मंत्री आणि भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांनी मतदान केले.
मेट्रो मॅन श्रीधरन यांनीही पोन्नानीमध्ये मतदान केले.
दुपारी 12.00 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
दुपारी 12.00 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 34.71 टक्के, आसाममध्ये 33.18टक्के, केरळमध्ये 31.62 टक्के, पुदुच्चेरीत 35.71टक्के आणि तमिळनाडूत 22.92 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.









