(अध्याय सहावा)
भगवंतांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे साधू सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी व धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी ईश्वर अवतार घेतात पण गंमत अशी की, श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार आहेत हेच बहुतेकांनी ओळखले नव्हते. कुणी त्यांना गवळय़ाचा पोर म्हणून हिणवायचे, कुणी माखनचोर म्हणायचे, कुणी रणछोडदास म्हणून चेष्टा करायचे. काही लोक द्वारकेचे यादवराज म्हणून ओळखायचे. अगदी त्यांनी विश्वरूप दाखवेस्तोवर अर्जुन त्यांना स्वतःचा मित्रच समजत होता पण विश्वरूप बघितल्यावर त्याचे डोळे उघडले आणि त्याने चुकीची कबुली दिली ती अशी, समान मानी अविनीत-भावे । कृष्णा गडय़ा हाक अशी चि मारी न जाणता हा महिमा तुझा मी । प्रेमे प्रमादे बहु बोल बोले 41 खेळे निजे स्वैर चि खात बैसे ।चेष्टा करी सर्व तुझ्या समोर जनी मनी वा तुज तुच्छ लेखे । क्षमा करी भान तुझे कुणास 42 आहेस तू बाप चराचरास । आहेस मोठी गुरु-देवता तू तुझी न जोडी तुज कोण मोडी । तिन्ही जगी ह्या उपमा चि थोडी 43 भगवंतही ते ओळखून होते याबाबत ते गीतेत म्हणतात, मज मानव-रूपात तुच्छत्वे मूढ देखती । नेणूनि थोरले रूप जे माझे विश्व-चालक 9.11 भगवंतांनी जरी ते ईश्वरी अवतार आहेत ही गोष्ट कुणाला सांगितली नसली तरी त्यांच्या काही परमभक्तांनी ही बाब ओळखली होती त्यामध्ये नारदमुनी, अप्रुर, सुदामा, भीष्म, कुंती, द्रौपदी इत्यादींचा समावेश होतो. भगवंतांनीही त्यांना वेळोवेळी याची प्रचिती दिली होती. पहिल्या पाच अध्यायामध्ये जनकराजा व जयंतीपुत्र मुनिवर्य संवादाचा पुरातन पवित्र इतिहास नारदांनी वसुदेवांना सांगितला. त्यामुळे श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्मस्वरूप आहेत ही त्यांची भावना दृढ झाली. निरावयव परब्रह्म श्रीकृष्ण रूपाने सावयव होऊन आलेले आहेत हे कळल्यावर, त्याचे मनोहर वैभव पाहण्यासाठी स्वर्गलोकातून देव येणार आहेत. त्या देवांनी गायलेली स्तुतिस्तोत्रे आणि श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला महाबोध ही रसाळ कथा आपण आता पाहणार आहोत.
श्रीकृष्णमूर्तीचे कौतुक पाहण्यासाठी सगळे देव वेगाने धावले. प्रजेची उत्पत्ती करण्यासाठी पूर्वी नेमणूक झालेले प्रजापतीही द्वारकेत अवतीर्ण झाले. सनकादिक आत्माराम हेही मनात मेघश्याम पहायची इच्छा धरून द्वारकेत अवतरले. भूतनायक सर्व 11 रुद्रगण श्रीकृष्णाला पहायला भूतगणासमवेत आले. गणांचा समुदाय घेऊन श्रीकृष्णरायाला पहायला भूतभविष्यांचा त्रिकाळज्ञाता असलेले महादेव द्वारकेत आले. श्रीकृष्णदर्शनाची त्यांना एवढी उत्कंठा होती की धावता धावता त्यांच्या सगळय़ा जटा मोकळय़ा सुटल्या होत्या एकूण 50 मरुग्दणासह इंद्र स्वतः श्रीकृष्णाला पहायला आला. रविमंडळ आणि बारा आदित्यांचा मेळा सोडून तृषार्त डोळय़ांनी सूर्य कृष्णसोहळा पहायला आला. श्रीकृष्णाचे मुखकमळ पाहून सूर्याच्या डोळय़ाचे पारणे फिटले. गारह पत्य, दक्षिणाग्नी आहवनिय असे तिन्ही अग्नी तेजःपुंज असले तरी धुराने झाकोळून गेले होते. कृष्णाला पाहून उजळून निघाले. आठही वसूंचा मेळा, अश्विनीकुमार धन्वंतरी, ऋषभदेव अंगिरस असे अनेक देवी देवता द्वारकेत दाखल झाले.







