प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी परिसरात ऊस पिकावर रोगाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. हा रोग नेमका कोणता?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सदर रोगाची लक्षणे पाहता उसाच्या वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याच्या भीतीने ऊस उत्पादक शेतकऱयांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
परिसरात सर्वाधिक उत्पादन उसाचे घेतले जाते. गेल्या 20 वर्षात ऊस पिकात वाढ झाली आहे. असे असले तरी अधूनमधून या पिकाला विविध रोगांची लागणही होत असते. सध्या उसावर पडलेल्या रोगामुळे नव्याने आलेल्या फुटव्यांची वाढ होताना दिसत नाही. तसेच कांडय़ा बारीक दिसत असून यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तीन महिन्यापर्यंतच्या उसाला ही लागण झाली असून विशेषतः खोडवा उसावर याचा अधिक प्रार्दुभाव जाणवत आहे.
याचबरोबर उसाची पानेही पिवसर व पांढरी झाल्याचे दिसत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी निपाणीतील कृषी कार्यालयात आल्या आहेत. त्याची दखल घेऊन कृषी अधिकारी पुरुषोत्तम पिराजे व सहकाऱयांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पिकाची पाहणी केली जात आहे.
या संदर्भात बोलताना कृषी अधिकारी पिराजे म्हणाले, निपाणी परिसरात ऊस पिकावर रोगाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार पाहणी केली असली तरी हा रोग नेमका कोणता हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे तुकानट्टी(ता. गोकाक) येथील कृषी विज्ञान केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे. येथील तज्ञांनी ऊस पिकाची पाहणी करुन रोगाचे निदान केल्यानंतर आवश्यक उपाययोजना शेतकऱयांना कळविण्यात येतील, असे सांगितले.









