पद्मविभूषणप्राप्त डॉ. व्ही. के. अत्रे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
इंजिनिअरिंग हे क्षेत्र सामाजिक गरजा व वैज्ञानिक ज्ञान यामधील दुवा आहे. नागरिकांना जाणवणाऱया समस्या इंजिनिअर वैज्ञानिक माहितीच्या आधारे सोडवित असतात. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे मागील काही वर्षांमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत आहेत. त्यामुळे पुढील काळात इंजिनिअर लोकांना अजून चांगले दिवस येतील, असा विश्वास पद्मविभूषणप्राप्त व भारत सरकारच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. के. अत्रे यांनी व्यक्त केला.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) 20 वा पदवीदान समारंभ शनिवारी व्हीटीयूच्या सभागृहात पार पडला. पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सेपेटरी आशुतोष शर्मा, व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्दप्पा, डीन डॉ. एन. व्ही. नायडू उपस्थित होते.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
केंद्र सरकारने शिक्षण पद्धतीत बदल करून नवे शैक्षणिक धोरण 2020 पुढे आणले. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची अनेक द्वारे खुली होणार आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व्हीटीयू अनेक उपक्रम राबवित आहे. शिक्षणतज्ञ, संशोधक, नवीन प्रयोग करणारे विद्यार्थी यांचे वर्कशॉप, वेबिनार घेतले जात आहे. विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता मिळावी यासाठीच हा प्रयत्न असल्याचे कुलगुरु डॉ. करिसिद्दप्पा यांनी सांगितले.
राष्ट्रगीताने पदवीदान समारंभाची सुरुवात झाली. प्रा. आशुतोष शर्मा यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद डॉक्टरेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. मंगळूर येथील अस्मत शर्मिन टी. एस. ही तब्बल 13 सुवर्णपदकांची मानकरी ठरली. बेंगळूर येथील अरुण डी., गंगा रेड्डी व म्हैसूर येथील अपूर्वा एच. आर. यांना प्रत्येकी 6 सुवर्णपदके देण्यात आली. यावषी कोरानामुळे पीएचडी व इतर पदवीधारकांना दुपारनंतर पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली.
सुवर्णपदकांवर बेंगळूर, मंगळूरची छाप
व्हीटीयूअंतर्गत राज्यातील 221 इंजिनिअरिंग कॉलेजचा समावेश होतो. यावषीच्या पदवीदान समारंभावर बेंगळूर व मंगळूरच्या विद्यार्थ्यांची छाप पुन्हा एकदा दिसून आली. सर्वाधिक सुवर्णपदके मंगळूर व बेंगळूरच्या विशेषतः विद्यार्थिनींनीच पटकाविली. यामुळे राज्यातील इतर भागातील कॉलेजचा क्वचितच सहभाग होता. बेळगावच्या तीन व हल्याळ येथील एका विद्यार्थिनीला सुवर्णपदक वगळता उत्तर कर्नाटकाला कोणतेही यश मिळालेले नाही.
केरळच्या मुलीने कर्नाटकात पटकाविली 13 सुवर्ण
केरळच्या कासरगोड येथील असणारी अस्मत शर्मिन ही उच्च शिक्षणासाठी मंगळूर येथे आली होती. तिने मंगळूरच्या सहय़ाद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. वडील व्यापारी व आई गृहिणी असणाऱया सर्वसामान्य कुटुंबातील अस्मत हिने या विभागात तब्बल 13 सुवर्णपदके मिळविली. भविष्यात नोकरी करून पुढील शिक्षण घेणार असल्याची माहिती तिने ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









