निवडणूक आयोगाकडून अंतिम टक्केवारी घोषित
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दुसऱया टप्प्यात एकंदर 86.11 टक्के मतदान झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही माहिती शुक्रवारी दिली. संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या नंदीग्राम मतदारसंघात 88.01 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात हा मतदानाचा विक्रम असून 2016 च्या विधानसभा निवडणुकीत येथे 85 टक्के मतदान झाले होते. येथे भाजपचे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चुरशीची लढत आहे. जिल्हय़ांचा विचार करता या टप्प्यात पूर्व मेदिनीपूर जिल्हय़ात सर्वाधिक 87.42 टक्के मतदान झाले. सर्वात कमी 83.84 टक्के मतदान पश्चिम मेदिनीपूर जिल्हय़ात झाल्याचे सांगण्यात आले.
27 मार्चला संपलेल्या पहिल्या टप्प्यात एकंदर 84.63 टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले होते. दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून सरासरी साधारणतः 85.40 टक्के मतदान झाले आहे. ही सरासरी 2016 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा किंचित अधिक आहे. मतदानाचा तिसरा टप्पा 6 एप्रिलला होणार आहे.
आसाममध्ये 77 टक्क्यांहून अधिक
आसाममध्ये दुसऱया टप्प्यात 39 मतदारसंघांचा समावेश होता. या टप्प्यात एकंदर 77.21 टक्के मतदान झाले. हे 2016 च्या याच मतदारसंघांमधील निवडणुकीपेक्षा 3 टक्के अधिक आहे. आसाममध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही. या राज्यातही तिसरा आणि अखेरचा टप्पा 6 एप्रिलला आहे. पश्चिम बंगालमध्ये तिसऱया टप्प्यानंतर आणखी 5 टप्पे असून 29 एप्रिलला प्रकिया संपणार आहे. तिसऱया टप्प्यात पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि केरळमध्येही विधानसभा निवडणुका होत आहेत. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे. तेथे 30 जागा आहेत. तर केरळमध्ये 140 तर तामिळनाडूत 234 जागा आहेत. येथे एकाच वेळी मतदान होत आहे. सर्व टप्प्यांचे परिणाम 2 मे यादिवशी मिळणार आहेत.









