कोल्हापूरची स्कायलाईन बदलणार ः युनिफाईड बायलॉजमुळे बांधकाम विकासाला नव आर्थिक वर्षांत गती
संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूरकारांसाठी एक गुड न्यूज आहे. नव्या आर्थिक वर्षांत कोल्हापूर शहरात तब्बल 18 मजली टोलजंग अशी इमारत आकारास येणार आहे. आजवर कोल्हापुरात वंडर इलेव्हन अर्थात अकरा मजली इमारतीचे अप्रुप होते. आता 51 मीटर उंचीची म्हणजे 18 मजली इमारत कोल्हापूरकारांच्या आनंदाची उंची वाढविणारी ठरणार आहे. या इमारत उभारणीसाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने प्रोजेक्ट फाईल महापालिकेच्या नगरररचना विभागाकडे पाठविली आहे. सध्या फाईल आयुक्तांच्या स्तरावर मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. मंजुरी मिळताच इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार आहे.
राज्यात युनिफाईड बायलॉजची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला गती मिळत आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासही बांधकाम व्यावसायिकांसाठी युनिफाईड बायलॉज उपयुक्त ठरत आहेत. नव आर्थिक वर्षांत सकारात्मक परिणामही अपेक्षित आहेत. कोल्हापूरच्या बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीनेही बायलॉज महत्वपूर्ण ठरणार आहे. परवनगीची प्रक्रिया सुलभ आणि क्लिष्ट बांधकाम नियमावलीचे सुलभीकरण यामुळे प्रोजेक्टची फाईल मंजूर होण्यास लागणारा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर एफएसआय, पेड-अप एफएसआय, पेड प्रीमियम मिळणार असल्याने बांधकाम व्यवसायालाही चांगले दिवस येणार आहे. या नवीन नियमावलीचा लाभ घेऊन कोरोनाच्या पहिल्या संकटातून बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम व्यावसायिक बाहेर पडू पाहत आहे. महापालिकेला 2020-2021 या आर्थिक वर्षात नगररचना विभागाने दिलेल्या बांधकाम परवानगींच्या माध्यमातून वीस कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये 1035 मंजूर बांधकाम फाईल्सचा समावेश आहे. त्याचबरोबर काही फाईल्स मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. त्यामध्ये 18 मजली इमारतीच्या मंजुरीची फाईलही आहे.
बायलॉजमुळे 70 मीटर उंचीच्या इमारतीस परवानगी
युनिफाईड बायलॉजमधील तरतुदीमुळे कोल्हापूर शहरात तब्बल 70 मीटर उंची म्हणजेच 229.60 फूट उंचीची इमारत बांधणे शक्य झाले आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 23 मजले होतात. पण अजून कुणीही 23 मजल्याची इमारत बांधण्यास पुढे आलेले नाही. मात्र 18 मजल्यांची इमारत बांधण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या नगररचना विभागाकडे परवानगीं मागितली आहे. उपनगरातील जागेत उभारण्यात येणाऱया या इमारतीच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. आयुक्त, प्रशासकस्तरावर परवानगी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
पहिली वंडर इलेव्हन
कोल्हापूर शहरात पहिली अकरा मजली इमारत (वंडर इलेव्हन) कदमवाडी परिसरात अनंतपूरमच्या रूपाने उभारली गेली. त्यानंतर आता शहरात आठ ते दहा वंडर इलेव्हन आहेत.
पार्किंगची उंची वगळून 70 मीटरची कमाल मर्यादा
युनिफाईड बायलॉजमध्ये जास्तीत जास्त 70 मीटर अर्थात 229.60 फूट उंची इमारत उभारण्यास मुभा आहे. एक मीटर म्हणजे 3.28 फूट. 51 मीटरची इमारत बांधली तर ती अंदाजे 18 मजल्यांची होते. 70 मीटर उंचीच्या इमारतीत 23 मजले होतात. 70 मीटर उंची ही पार्किंग वगळून आहेत.
युनिफाईड बायलॉजमधील तरतुदीमुळे उंच इमारती बांधणे शक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरात उंच, टोलजंग इमारती उभारलेल्या दिसतील, शहराचे अवकाश अर्थात आहेस्कायलाईन बदललेली दिसेल. विकासाच्या दृष्टीने ती केवळ कौतुकास्पद नव्हे तर अभिमानास्पद असेल.
-महेश यादव, माजी अध्यक्ष, क्रीडाई कोल्हापूर कौतुकास्पद









