- मागील 24 तासात 4,974 नवीन कोरोना रुग्ण
ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असून रुग्ण संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयांची क्षमता अपुरी पडू लागली आहे. मीडियाकडून गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 4,974 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 98 जणांनी आपला जीव गमावला आहे.
20 जून 2020 नंतरची ही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. 20 जूनला एका दिवसात 5,948 रुग्ण आढळून आले होते. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत देशात कोविड 19 चे 6 लाख 72 हजार 931 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14,530 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 6 लाख 5 हजार 274 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एवढी वाढली आहे की तेथील रुग्णालयांची क्षमता अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे पीआयएमएस देशातील तृतीयक चिकित्सा सेवा रुग्णालय आहे जेथे देशभरातील रुग्ण अत्यावस्थ स्थितीत आणले जातात तेथे देखील बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना दुसरीकडे न्यावे लागत आहे.
अशीच परिस्थिती इस्लामाबाद मधील पॉलिक्लिनिकमध्ये आहे. येथे एकही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही आहे. येथे विविध विभागात दररोज 7 हजार रुग्ण येतात. त्यामुळे येथील परिस्थिती चिंताजनक बनली असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.









