नेहरूनगर येथील महिलेची पर्स लांबविली
प्रतिनिधी / बेळगाव
बाजारपेठेत पाकिटमारांचा सुळसुळाट वाढला आहे. खासकरून महिला पाकिटमारही सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी मुलाला कपडे खरेदीसाठी गेलेल्या नेहरूनगर येथील एका महिलेची पर्स लांबविण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयात ही घटना कैद झाली आहे.
यासंबंधी विद्या यशवंत यादव यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास विद्या या कपडे खरेदी करण्यासाठी मारुती गल्लीतील एका दुकानात गेल्या होत्या. याच दुकानात ग्राहक असल्याचे भासवून प्रवेश केलेल्या दोन महिलांनी बॅगमधील पर्स पळविली आहे.
या पर्समध्ये 12 हजार रुपये रोख रक्कम, एटीएम कार्ड, आधारकार्ड आदी साहित्य होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून खरेदीच्या बहाण्याने कापड दुकानात आलेल्या दोन महिलांनी बॅगमधील पर्स पळविल्याचे उघडकीस आले आहे. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकीय मेळाव्यातही पाकिटमारांनी आपली करामत दाखविली आहे. गांधी भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात सुमारे 10 जणांची पाकिटे मारल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल झाली नाही.