होळी झाली की मोसम बदलतो हा नेहमीचा अनुभव आहे. हवेतील थंडी नाहीशी होऊन उष्म्याच्या झळा जाणवू लागतात. माणसांचा हा अनुभव देवांनाही का येऊ नये ? निदान माणसांशी भावना असते. म्हणून उत्तर प्रदेशातील बाँके बिहारी मंदिरात होळीनंतर देवांनाही थंड भोजन आणि पेये दिली जातात.

हे मंदीर देशभरात प्रसिद्ध आहे. येथे हिंवाळय़ात देवांना उष्ण पदार्थांचा तर उन्हाळय़ात शीत पदार्थांचा व पेयांचा नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. या पदार्थांमध्ये वैविध्य असते. सुगंधासाठी वाळय़ाचा उपयोग केला जातो. उन्हाळय़ाचा देवांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सर्व दक्षता घेतली जाते. गेल्या मंगळवारपासून होळीनंतर हा नैवेद्य सुरू झाला आहे. याशिवाय प्रतिवर्ष कामदा एकादशीच्या दिवशी देवांना शीतलतेचा आनंद मिळावा म्हणून फूलबंगला स्थापन केला जातो. त्यात देवांचा निवास असतो. यावेळी त्यांचे दर्शन घेण्याचा योग साधण्यासाठी देशभरातून हिंदू भाविक येथे येतात. त्यांचे आरक्षण कित्येक महिने आधीच केले जाते. यंदा 23 एप्रिलला कामदा एकादशी आहे. त्यामुळे देवस्थानाच्या व्यवस्थापनाची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे.









