(अध्याय पाचवा)
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।
हा भागवतातील नवविधा भक्तीचे वर्णन करणारा श्लोक सर्वानाच माहीत आहे. पहिली श्रवण भक्ती होय यामध्ये भक्त हरिचे गुण, चरित्र, पराक्रम मनापासून ऐकतो ती ऐकून हरिवर त्याची श्रद्धा दृढ होते हरिभक्ती केल्याने आपला उद्धार होईल, आपल्याला ईश्वर प्राप्त होईल अशी खात्री त्याला वाटू लागते श्रीव्यासमुनींनी भागवताची रचना करून त्यात हरिच्या विविध अवतारांची माहिती दिली. शुक मुनींनी ती अत्यंत रसाळ भाषेत ती परीक्षित राजाला ऐकवली. ती ऐकून त्याचा उद्धार झाला. शुकमुनींनी केलेल्या कीर्तनाचे हे महत्त्व लक्षात घेतले की, कीर्तनभक्ती करावी तर शुकमुनींसारखी असे म्हणतात. कीर्तनामध्ये ईश्वराचे गुण, चरित्र, नाममहात्म्य, पराक्रम इत्यादींचे आनंदात आणि उत्साहात गाऊन नाचून वर्णन करायचे असते. भगवंतांनाही ते फार आवडते कारण सततच्या कीर्तनामुळे भक्त आपोआपच त्यांच्याशी जोडला जातो गीतेच्या नवव्या अध्यायात ते सांगतात, अखंड कीर्तने माझ्या यत्न-शील दृढ-व्रती । भक्तीने मज वंदूनि भजती नित्य जोडिले ।।9.14 ।।इथेही करभाजन मुनींनी कलियुगाचा महिमा सांगताना कीर्तनाला फार महत्त्व आहे असे सांगितले. करभाजन म्हणाले, ‘राजा कलियुग अत्यंत धन्य होय. कारण त्यात हरिकीर्तन आणि नामस्मरणाने सर्व मनोरथ सिद्धीस जातात. कीर्तनाने चित्तशुद्धी होते आणि त्यामुळे मोक्षप्राप्ती होते. ही गोष्ट कलियुगातच शक्मय आहे. देवसुद्धा मुक्ती मिळावी म्हणून, पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याची इच्छा धरतात. तेव्हा निरंतर नामस्मरण करावे. इतर युगातील कोणत्याही साधना पद्धतीपेक्षा हरिकीर्तन श्रे÷ आहे म्हणून तर गोपगोपिकांची प्रेमाची साद ऐकून देव भुलून गेले व त्यांच्या बरोबर आनंदून गेले. नामसंकीर्तनाच्या योगाने चारही वर्ण मुक्त होतात ही कलियुगाची थोरवी आहे. कीर्तनाने स्वधर्म जोडला जाऊन वाढीस लागतो आणि चारही मुक्ती हात जोडून उभ्या राहतात. कलियुगात भगवंत सुलभ झाला आहे म्हणून भाग्यवान लोक हरिकीर्तनाचा मोठा लोभ धरतात. हरिकीर्तनाने चारही मुक्ती कशा साधतात पहा. कीर्तनाच्या जयघोषाला भुलून देव वैकुंठ सोडून कीर्तनाच्या स्थानी येतात आणि परत जायचे विसरून जातात. जेथे यदुनाथ राहतो तेथे वैकुंठही येते आणि भक्ताला सलोकता मुक्ती प्राप्त होते. कीर्तनाच्या गजरामुळे भगवंत भक्ताच्या समीप येतो आणि भक्त समीपता मुक्तीचा धनी होतो. कीर्तनात वर्णन केलेला भगवंत भक्ताला सर्वत्र दिसू लागतो भक्ताच्या अंतःकरणात शामसुंदर पितांबरधारी चतुर्भुज भगवंतांचे ध्यान सहजच अंकित होते आणि देवाची सर्व चिन्हे भक्ताला प्राप्त होतात. हरिकीर्तनाने अत्यंत प्रमुदित झालेला भगवंत भक्ताला अतिशय आनंदाने मिठी मारतो आणि पुन्हा कधी विभक्त होत नाही. अशाप्रकारे हरिकीर्तनाने चारही मुक्ती दासी होऊन राहतात. पण हरिभक्ती पुढे भक्तांना त्याचे काहीच महत्त्व वाटत नाही. ते त्याकडे दुर्लक्ष करून हरिभक्ती करत राहतात. त्या हरिभक्तीविषयी जाणून घेऊयात उद्याच्या भागात…







