विराटने तिसऱया क्रमांकावरच फलंदाजीला उतरावे, माजी निवडकर्ते सरणदीप सिंग यांचे मत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा-शिखर धवन हेच सलामीला उतरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरावेत, असे मत माजी निवड समिती सदस्य सरणदीप सिंग यांनी व्यक्त केले. अलीकडेच इंग्लंडविरुद्ध संपन्न झालेल्या मालिकेत विराट कोहलीने सलामीला उतरत या जागेवर स्वारस्य दाखवले होते. त्या पार्श्वभूमीवर सरणदीप बोलत होते.
भारताने ऑस्ट्रेलियन भूमीत ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केला, त्यावेळी सरणदीप सिंग यांची निवड समिती सदस्यत्वाची मुदत पूर्ण झाली होती. आपल्या निवड समितीच्या कारकिर्दीत तिन्ही क्रिकेट प्रकारात स्वतंत्र कर्णधार नियुक्त करण्याबाबत एकदाही चर्चा झालेली नव्हती, असे सरणदीप यांनी याप्रसंगी नमूद केले.
इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकाविजय संपादन केल्यानंतर विराट कोहलीने आपण रोहित शर्मासमवेत विश्वचषकात सलामीला उतरु शकतो, असे नमूद केले होते. अगदी आयपीएल स्पर्धेत आरसीबीतर्फे सलामीलाच फलंदाजीला उतरण्याचे संकेत त्याने यापूर्वी दिले आहेत. इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत सलामी लढतीनंतर धवनला वगळले गेले आणि एका लढतीत इशान किशनला सलामीला उतरवले गेले. त्यानंतर तिसऱया व शेवटच्या लढतीत विराट व रोहित सलामीला उतरले होते.
‘माझ्यासाठी हे खूप आश्चर्याचे आहे. धवनने आयपीएल स्पर्धा गाजवली. तो ऑस्ट्रेलियातही उत्तम खेळला. जेथे तो खेळला, तेथे सर्वोत्तम कामगिरी केली. तो मानसिकदृष्टय़ा खंबीर आहे. काही पर्याय जरुर आजमावले गेले असतील. यात काही गैरही नाही. पण, टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी रोहित व धवन हेच सर्वोत्तम पर्याय ठरतील’, असे सरणदीप वृत्तसंस्थेशी बोलताना पुढे म्हणाले.
‘केवळ एकाच सामन्यातील कामगिरीनंतर धवनच्या खेळाची मीमांसा करणे योग्य ठरत नाही. त्यानंतर त्याने वनडे क्रिकेटमध्ये उत्तम खेळ साकारला आहे. आयपीएलमध्ये बरेच काही निश्चित होईल. संघात सहजासहजी जागा मिळण्याचे हे दिवस नाहीत. अगदी इशान किशनला देखील संघातील जागा अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील’, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
केएलनेच यष्टीरक्षण करावे
वनडे क्रिकेटमध्ये केएल राहुलने यष्टीरक्षण करावे आणि श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज होईतोवर बहरातील रिषभ पंतने केवळ फलंदाज म्हणून खेळावे. फिरकीच्या आघाडीवर रवींद्र जडेजा तंदुरुस्त होऊन परतल्यानंतर तो प्रथम पसंतीचा असेल. कुलदीपला फारशी संधी मिळत नसल्याने त्याचे मनोधैर्य खचले असल्याचे जाणवते. चहल व कुलदीप यांनी एकत्रित खेळणे गरजेचे आहे. त्यांच्यात बरीच गुणवत्ता आहे’, असे सरणदीप म्हणाले. मागील 6 महिन्यात रिषभ पंतने बरीच मेहनत घेतली असल्याचे त्याच्या खेळावरुन दिसून येते, असेही त्यांनी नमूद केले. 41 वर्षीय सरणदीप यांनी भारतीय संघातर्फे 3 कसोटी व 5 वनडे सामने खेळले आहेत.









