वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंड संघाने रविवारी येथे झालेल्या टी-20 मालिकेत विजयी सलामी देताना बांगलादेशचा 66 धावांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी मिळविली. न्यूझीलंडच्या देवॉन कॉन्हेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 210 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडच्या डावात देवॉन कॉन्हेने 52 चेंडूत 3 षटकार आणि 11 चौकारांसह नाबाद 92 धावा तर सलामीच्या गुप्टिलने 27 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 35 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. गुप्टिल बाद झाल्यानंतर कॉन्हे आणि यंग यांनी तिसऱया गडय़ासाठी 103 धावांची भर घातली. यंगने 30 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 53 धावा झळकवल्या. कॉन्हे आणि फिलिप्स यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 52 धावांची भागिदारी केली. कॉन्हेने 52 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 92 तर फिलिप्सने 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 24 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 10 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे नेसुम अहमदने 30 धावांत 2 तर मेहदी हसनने 37 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात अतिफ हुसेनने 33 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 45, मोहम्मद सैफुद्दिनने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 34, सलामीच्या मोहम्मद नईमने 18 चेंडूत 5 चौकारांसह 27, कर्णधार मेहमुदुल्लाने 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे सोधी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 28 धावांत 4 तर फर्ग्युसनने 25 धावांत 2, तसेच साऊदी आणि बेनेट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्व टीम साऊदीकडे सोपविण्यात आले होते. न्यूझीलंडच्या कॉन्हेने आपल्या 12 व्या टी-20 सामन्यात चौथे अर्धशतक झळकवले. अलीकडेच न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका एकतर्फी जिंकली होती. आता ते टी-20 मालिका पुन्हा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 20 षटकात 3 बाद 210 (कॉन्हे नाबाद 92, यंग 53, गुप्टिल 35, फिलिप्स नाबाद 24, नेसुम अहमद 2/30, मेहदी हसन 1/37).
बांगलादेश 20 षटकात 8 बाद 144 (अतिफ हुसेन 45, सैफुद्दिन नाबाद 34, मोहम्मद नईम 27, मेहमुदुल्ला 11, सोधी 4/28, फर्ग्युसन 2/25, साऊदी 1/34, बेनेट 1/20).









