प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर हे कोरोना बाधितांच्या प्रमाणात सुरुवातीपासून पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. शहरातील बहुतांशी भाग हा कोरोना संक्रमित झालेल्या रुग्ण आढळून आलेल्याच आहे. त्यामध्ये नव्यानेही पुन्हा कोरोना बाधित होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने शहरातील बहुतांशी ठिकाणी मायक्रो कंटेटमेंट झोन होत असल्याचे चित्र आहे. शहरात तब्बल 43 ठिकाणे अशी आहेत की तेथे मायक्रो कंटेटमेंट झोन आहेत. त्यामुळे शहरवासियांनी जर नियम न पाळल्यास सातारा शहर पुन्हा लॉकडाऊन होवू शकते. पालिका प्रशासन पायाला भिंगरी लावून पळते आहे. परंतु सारे काही नागरिकांच्याच हातात आहे कोरोनाला अटकाव करण्यासाठी त्रिसुत्री पाळणे गरजेचे आहे.
शहरात पहिला रुग्ण जेव्हापासून आढळून आला तेव्हापासून शहरातील बाधित होण्याचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. शहरातील बाधित होण्याचे प्रमाण हे वाढत असल्याने चिंतेचे चित्र प्रत्येक पेठेत आहे. गतवर्षीच्या तुलनेत अधिक संख्या वाढत असल्याने त्या त्या परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र पालिकेने शासनाच्या नियमानुसार केलेली आहेत. शहरातील हॉटस्पॉटची ठिकाणे नेहमी बदलत आहेत. कोरोनाचा संसर्ग हा कसा कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शासनाकडून वारंवार त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. त्याचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे शहरातील सदरबाजार आणि मंगळवार पेठेतल्या गर्दीच्या ठिकाणाध्ये सुक्ष्म कंटेटमेंट झोन आढळून येत आहेत. त्यामध्येच दोन दिवसांपुर्वी चौपाटीवरील चार जण कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर लगतच्या सुपनेकर या हॉटेलमध्ये बाधित आढळून आला. तसेच पिलके स्टोअर्स येथेही बाधित आढळून आला. त्यामुळे शहरात नियमाला जर फाटा दिला तर कोरोना काठाजवळ आपोआपच येत आहे. त्यामुळे सध्या शहरात 43 ठिकाणी मायक्रो कंटेटमेंट झोन झाले आहेत.









