सरस्वती नार्वेकरांची ‘घरकुल’ची प्रतीक्षा कायम
जैतापूर
घरकुलासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने राजापूर तालुक्यातील कुवेशी नार्वेकरवाडी येथील सरस्वती हरिश्चंद्र नार्वेकर ही 65 वर्षीय निराधार महिला गेल्या 7 ते 8 वर्षांपासून शेजाऱयांच्या पडवीमध्ये आपले जीवन व्य्<ातित करत आहे.
निराधार विधवा असलेल्या सरस्वती नार्वेकर यांचे राहते घर 7 ते 8 वर्षांपूर्वी पूर्णपणे जमीनदोस्त झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे मोडकळीस आलेले घर त्या पुन्हा उभारू शकल्या नाहीत. गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मिळावे, यासाठी प्रयत्न केल्याचे आणि प्रसंगी ग्रामपंचायतीपासून अगदी तालुका पंचायत समितीपर्यंत अनेकवेळा फेऱया मारल्याचे सांगत आहेत. त्यांना प्राधान्यक्रमाने घरकुल मिळावे, यासाठी वारंवार प्रशासनाकडे विनंती करण्यात आली. मात्र शासनाचे निकष आणि चाकोरीबद्ध कामकाजाच्या पलिकडे जाऊन खरोखरच गरजू असलेल्या सरस्वती नार्वेकर यांचे घर उभे रहावे यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत.
या संदर्भात विद्यमान सरपंच मोनिका कांबळी व सामाजिक कार्यकर्ते मनोहर कांबळी यांच्याकडे संपर्क साधला असता सरस्वती नार्वेकर या बेघर झाल्या आहेत. ही वस्तूस्थिती असल्याचे सांगितले. त्यांना प्राधान्याने घरकुल मिळावे, यासाठी आम्हीही वारंवार विनंत्या केल्या आहेत. त्यांच्याप्रमाणेच गावातील अन्य 5 लोकांना तातडीने घरकुल योजनेंचा लाभ मिळणे अत्यावश्यक असून त्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. दरम्यान नार्वेकर यांचे घर जमीनदोस्त झाले तरी दरवर्षी त्या घरपट्टी भरत आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी या संदर्भात लक्ष घालून प्रसंगी पदाचा आणि अधिकाराचा वापर करून सरस्वती नार्वेकर यांच्यासारख्या अनेक लोकांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जि.प. सीईओ, आमदार साळवींना साकडे घालणार
सरस्वती नार्वेकर यांना शासनाच्या माध्यमातून निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी बचत गटाच्या महिला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी तसेच आमदार राजन साळवी यांसह शासन व प्रशासनाला साकडे घालणार आहेत.
अद्याप ‘ड’ यादीतील घरकुल मंजुरीबाबत आदेश नाहीत
2013 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार घरकुलच्या लाभार्थ्यांची ‘ब’ यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत वंचित राहिलेल्यांसाठी ‘ड’ यादी तयार करण्यात आली आहे. घरकुलसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांची यादी मंजूर होते. सद्यस्थितीत ‘ब’ यादीत समाविष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. अद्याप ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांच्या घरकुल मंजुरीबाबत शासनाकडून आदेश आलेले नाहीत.









