नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कुख्यात गुंड गँगस्टर मुख्तार अन्सारी याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. या आदेशानुसार पुढील दोन आठवडय़ात त्याला उत्तर प्रदेशातील कारागृहात स्थानांतरित करण्यात येणार असल्याचे समजते. गँगस्टर मुख्तार अन्सारी सध्या पंजाबच्या रोपड कारागृहात आहे.
खंडणीखोरी आणि धमकावण्याच्या आरोपाखाली पंजाब पोलिसांनी मुख्तारच्या विरोधात प्रॉडक्शन वॉरंट काढून त्याला पंजाबला नेले होते. तो उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड असून त्याच्या विरोधात काही प्रकरणे न्यायप्रविष्ट होती. मुख्तारला ताब्यात घेण्यावरून पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. मुख्तारने दिल्ली कारागृहात हलवण्यात यावे असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मुख्तारचा अर्ज फेटाळून लावत त्याला उत्तर प्रदेशात स्थानांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. न्या. अशोक भूषण आणि आर. एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना ताबा देण्यासाठी दोन आठवडय़ांची मुदत घालून दिली आहे.
अन्सारीचा तातडीने ताबा देण्याचे आदेश पंजाब सरकार आणि रुपनगर कारागृह प्रशासनाला देण्याची मागणी करणारी याचिका उत्तर प्रदेश सरकारने दाखल केली होती. योगी आदित्यनाथ सरकारला रूपनगर कारागृहात असणाऱया अन्सारीचा ताबा मागण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद पंजाब सरकारने 4 मार्च रोजी केला होता. त्याच्यावर उत्तर प्रदेशमध्येही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.









