दोन दिवसांच्या बांगला देश दौऱयाला प्रारंभ, आज मातुआ मंदिराला भेट देणार
ढाका / वृत्तसंस्था
स्वतंत्र बांगला देशचे पहिले पंतप्रधान दिवंगत शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी पाकिस्तानकडून बांगला देशाच्या नागरीकांवर केलेल्या अत्याचाराविरोधात 70 च्या दशकात आवाज उठविला होता. बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ती वाहिनीच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्ययुद्ध छेडले होते. त्यानंतर 1971 मध्ये भारताने पाकिस्तानशी युद्ध करून बांगला देश स्वतंत्र केला. या सर्व आठवणींना पंतप्रधान मोदींनी उजाळा दिला.
त्यांच्या दोन दिवसांच्या बांगला देश दौऱयाला शुक्रवारी प्रारंभ झाला. या देशाची राजधानी ढाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यंदाचे वर्ष बांगला देशच्या स्वातंत्र्याचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अध्यक्ष अब्दुल हमीद यांच्या समवेत पंतप्रधान मोदी सुवर्णमहोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले. भारत आणि बांगला देश यांच्यातील मैत्री आता अधिकच दृढ झाली आहे, असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी आदराची भावना व्यक्त करण्यासाठी ‘मुजिब जॅकेट’ परिधान केले होते.
वंगबंधूंना गांधी शांतता पुरस्कार
शेख मुजिबूर रहमान यांना वंगबंधू म्हणून ओळखले जाते. त्यांना मरणोपरांत 2020 चा गांधी शांतता पुरस्कार घोषित करण्यात आला होता. हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुजिबूर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांना प्रदान करण्यात आला. प्रथमच हा पुरस्कार एकाद्या मान्यवर व्यक्तीला मरणोपरांत प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी हसीना यांनी भारताचे आभार मानले.
उद्योजकांना आमंत्रण
बांगला देशाच्या सुवर्णमहोत्सावानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाच्या 50 उद्योजकांना भारताचे आमंत्रण दिले होते. बांगला देशातील उद्योजकांनी भारताच्या संशोधन आणि तांत्रिक संशोधन वातावरणात सहभागी व्हावे. दोन्ही देशांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यास आर्थिक प्रगती वेगाने होऊ शकेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. यापुढच्या काळातही दोन्ही देश हातात हात घालून वाटचाल करतील असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
दंगलीत चार ठार
पंतप्रधान मोदी यांच्या बांगला देश दौऱयाला तेथील इस्लामी धर्मांध संघटनांचा विरोध आहे. या संघटनांनी या दौऱयाच्या निषेधार्थ चितगांव येथे मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिसंक वळण लागल्याने पोलीसांनी केलेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. तसेच काहीजण जखमी झाले असे सांगण्यात आले.
मातुआ मंदिरात दर्शन घेणार बांगला देशमध्ये मातुआ हिंदू समाज मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच हा समाज पश्चिम बंगाल या भारताच्या राज्यातही मोठय़ा संख्येने आहे. या मातुआ समाजाच्या देवतेचे मंदीर बांगला देशात आहे. पंतप्रधान मोदी आज शनिवारी या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेणार असून पूजाअर्चा करणार आहेत.









