बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बुधवारी रात्री उशिरा कोविड -१९ लसीचे आणखी ४ लाख डोस मिळाल्याची माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी एका ट्वीटमध्ये दिली. ते म्हणाले की, राज्यात लसीची कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दरम्यान कर्नाटकात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हंटले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकार तयारी करत आहे.
आतापर्यंत २९.९१ लाख लोकांना कर्नाटकात रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. ५.३४ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा प्रथम डोस घेतला आहे, त्यापैकी ३.२६ लाख जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. सरकारी आकडेवारी असेही सूचित करते की अनुक्रमे २ लाख आणि ६३,०७३ कामगारांनी प्रथम आणि द्वितीय डोस घेतला आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत १३.७६ लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिक (वय ६० वर्षांवरील) आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ३..८१ लाख लोकांना रोगप्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. या आठवड्यात केंद्राकडून आणखी १२ लाख डोस पाठविले जाण्याची शक्यता आहे.