अमेरिकेच्या न्यायालयाला विनंती – मुंबईवरील हल्ल्यांमध्ये हात
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
जो बायडेन प्रशासनाने पाकिस्तानी वंशाच्या तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाशी संबंधित भारताच्या अर्जावर विचार करण्याची विनंती अमेरिकेच्या संघीय न्यायालयाला केली आहे. तहव्वूर राणा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे. लॉस एंजिलिसमध्ये जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जॅकलिन चुलजियान 22 एप्रिल रोजी प्रत्यार्पणाप्रकरणी सुनावणी करणार आहेत.
भारताकडे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी राणाच्या विरोधात खटल्यासाठी प्रत्यार्पणविषयक सर्व पुरावे आहेत असे अमेरिकेचे असिस्टंट ऍटर्नी जॉन जे लुलजियान यांनी न्यायालयात म्हटले आहे. तर राणाच्या वकिलाने प्रत्यार्पणाला विरोध दर्शविला आहे.
तहव्वूर राणाला अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली होती, पण कोरोनाबाधित झाल्याने आणि प्रकृती बिघडल्याच्या आधारावर शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्याची मुक्तता करण्यात आली होती. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याने जून 2020 मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली. अमेरिकेच्या न्यायालयात सादर दस्तऐवजांनुसार राणा हत्या आणि हत्येच्या कटात सामील असल्याचे भारताने म्हटले आहे.
भारताने बजावले होते वॉरंट
राणाच्या विरोधात ऑगस्ट 2018 मध्ये भारतीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते. राणा स्वतःचा बालपणीचा मित्र डेव्हिड कोलमॅन हॅडलीसोबत मुंबईवरील हल्ल्याच्या कटात सामील होता. 2006 ते 2008 दरम्यान पाकिस्तानात कट रचण्यात आला, राणाने लष्कर-ए-तोयबाला मदत केली होती.









