कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा
प्रतिनिधी / कणकवली:
तालुक्यातील सिलिका मायनिंगबाबत महसूल विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पथकांकडून अजूनही मोजमापे घेण्यात येत आहेत. मोजमापे व ट्रेडिंग तपासणी अंतिम टप्प्यात असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, लीजची जागा एक व दुसऱया जागेवरील उत्खनन करून लीजच्या जागेत आणून ठेवलेल्या सिलिकाबाबत दंडात्मक कारवाईसोबतच सिलिका जप्त करण्याबाबतही कारवाई होण्याची गरज आहे. मात्र, दुसरीकडे ही कारवाई आता थांबावी यासाठीही काहींनी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील कासार्डे, पियाळी, वाघेरी, लोरे, फोंडाघाट आदी भागात गेल्या दोन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत सिलिका उत्खननाला जोर आला होता. शासनाची फसवणूक करत हे उत्खनन केले जात होते. या उत्खननाबाबतची माहिती पुढे येताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. महसूलकडून चार ते पाच पथके नेमून कारवाईसाठीची माहिती गोळा करण्यात येत आहे. मात्र, महसूल यंत्रणा मुळापर्यंत पोहोचत असल्याचे दिसताच काहींनी कारवाई कशी थांबविता येईल किंवा ती शिथील करण्यासाठीचा प्रयत्न चालू केला असल्याची चर्चा तालुक्यात आहे. याबाबत काहींनी दोन दिवसांपूर्वीच दुसऱया जिल्हय़ाचा दौराही केल्याचे समजते.
दरम्यान, लीज एका जागेचे अन अनधिकृत उत्खनन करून लीजच्या जागेत आणून सिलिका ठेवण्यात आल्याचे प्रकारही या कारवाईत पुढे आले आहेत. तसेच अनधिकृत ट्रेडिंग, वॉशिंग प्लांटची माहितीही पुढे आली आहे. मात्र, या साऱयावर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. महसूलकडून गेले 15 दिवस इतर कामे थांबवून हे काम केले जात आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ फार्स न ठरता त्यात शासनाची फसवणूक करणाऱयांना योग्य जरब बसण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.









