ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या कोलोराडोमधील एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला बोल्डर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, संशयित जखमी असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोल्डर विभागाचे पोलीस प्रमुख कमांडर केरी यामगुची यांनी यासंदर्भात स्थानिक मीडियाला माहिती दिली आहे.
यामगुची म्हणाले, बोल्डरमधील टेबल मेसा परिसरात असलेल्या किंग सुपर्स ग्रोसरी स्टोअर्समध्ये सोमवारी दुपारी 3 वाजता एका बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने कोणत्या उद्देशाने गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आली नाही.