जिल्हाधिकाऱयांची आढावा बैठकीत माहिती : दिव्यांग, वृद्धांनाही पोस्टलची सोय
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक 17 एप्रिल रोजी होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याने काही बदल करण्यात आले आहेत. 80 वर्षांवरील वृद्ध, दिव्यांग, कोरोनाबाधित व क्वारंटाईन असणाऱया व्यक्तींना यावेळी पोस्टल मतदानाची मुभा देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी यावेळी मतदान केंदांची संख्याही वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीसाठीची आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 23 मार्चपासून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 30 मार्च रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 3 एप्रिलला अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
27 ठिकाणी चेकपोस्टची नजर
अवैध दारूची वाहतूक व कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 27 ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत. बेळगाव तालुक्मयात कणबर्गी, सुळेभावी क्रॉस, काकती, संतिबस्तवाड, देसूर क्रॉस, हिरेबागेवाडी टोलनाका, अरळीकट्टी क्रॉस, बाची, बेकिनकेरे, राकसकोप या ठिकाणी चेकपोस्ट उभारले जाणार आहेत.
आचारसंहितेची अंमलबजावणी संपूर्ण जिल्हय़ात नसून केवळ गोकाक, अरभावी, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, सौंदत्ती, रामदुर्ग, बैलहोंगल या मतदार संघांमध्ये आचारसंहिता लागू असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी म्हणाले, मतदार संघातील 2 हजार 566 मतदान केंद्रांपैकी 600 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. बेळगाव तालुक्मयात 272 मतदान केंदे संवेदनशील आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त के. त्यागराजन, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुरगुंडी, जि. पं. सीईओ एच. व्ही. दर्शन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.