प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या जारी असणारे नियम आणखी कठोर करण्यात येतील. मात्र, कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊन, सेमी लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यु जारी न करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधानसौध येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यु जारी करण्यास आक्षेप घेतला. आधीच कोरोनामुळे मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. अशी परिस्थिती असताना पुन्हा लॉकडाऊन जारी झाले तर मोठे नुकसान होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केल्याचे सुत्रांकडून समजते.
आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कोरोना नियंत्रणासाठी सेमी लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यु जारी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण, येडियुराप्पा यांनी सध्या लॉकडाऊन नको. जनतेने कडक नियमांचे पालन करावे, यासाठी उपाययोजना करता येतील. अलिकडेच ढासळलेली अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन लादल्यास राज्याची आर्थिक स्थिती पार कोलमडून जाईल. कोरोना प्रादुर्भाव वाढला तर आणखी कठोर नियम जारी करूया, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
कोरोना संसर्ग अशाच रितीने वाढत गेल्यास कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या तज्ञांशी चर्चा करून निर्णय घेता येईल. पण सध्या लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु नको, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतील उपस्थितांनी त्यावर सहमती दर्शविल्याचे समजते.
शाळा-महाविद्यालये सुरूच राहणार : अश्वथ नारायण

शाळा आणि महाविद्यालये पुन्हा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. कोरोनाच्या उद्रेकामुळे आधीच एक वर्ष व्यर्थ गेले आहे. त्यामुळे पुढे देखील शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. लस उपलब्ध झालेली असतानाच कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत आहे. पण लॉकडाऊन जारी करणे हा सध्यातरी पर्याय नाही. परिणामी, ऑफलाईन वर्ग सुरूच राहणार आहेत. तसेच शाळा व महाविद्यालये सुरू राहतील, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथनारायण यांनी दिले.
अन्य राज्यांतून येणाऱयांवर कडक नजर

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आणखी तीव्र होत असल्याने आरोग्य खात्याने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोरोना नियंत्रणाचाच एक भाग म्हणून कोरोना संसर्ग अधिक असणाऱया महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि छत्तीसगढ या राज्यांमधून कर्नाटकात येणाऱयांना कोविड चाचणीचा (आरटी-पीसीआर) निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
सोमवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश आरोग्य खात्याने जारी केला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. कर्नाटकात केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब या चार राज्यांमधून येणाऱयांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
चार राज्यांत संसर्गात वाढ
या चार राज्यांमध्येच मोठय़ा प्रमाणात संसर्ग वाढला आहे. त्यामुळे तेथून कर्नाटकात येणाऱयांना 72 तास अगोदर केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. अशा राज्यांतून विमान, रेल्वे, बस व इतर मार्गाने येणाऱयांवर नजर ठेवण्यात येत आहे.









