राजेंद्र शिंदे / चिपळूण
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यात खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत क्षेत्रासाठी करार झालेला, मात्र मध्यंतरी बारामतीकडे गेलेला जगविख्यात कोकाकोला प्रकल्प आता पुन्हा कोकणात तेही लोटेतच परत येत आहे. प्रकल्पासाठीची आवश्यक पूर्तता एमआयडीसीकडून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्रकल्पासाठी 90 एकर जागा देण्यात आली आहे. साधारणपणे हजार कोटीच्या दरम्यान गुंतवणूक होणार आहे.
तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यात कोकणच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडताना जगविख्यात कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या होत्या. सुमारे हजार कोटी रूपये गुंतवणुकीतून उभ्या राहणाऱया या प्रकल्पातून ज्यूस, बाटलीबंद पाणी व शीतपेय यांचे उत्पादन घेतले जाणार आहे. याद्वारे पाचशेहून अधिकजणांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. राज्यातील हा चौथा प्रकल्प असल्याने कोकाकोला प्रकल्पाच्या वरिष्ठ टिमने यापूर्वी तीन-चारवेळा येथे पाहणी करत परिसरातील हवा, पाणी, मातीचे नमुने घेतले होते.
प्रकल्पाच्यादृष्टीने महत्वाचे असलेल्या कोयनेचे प्रचंड अवजल, जवळचा कोकण रेल्वे मार्ग, गरज पडलीच तर गुहागर अथवा दापोली ही जवळची बंदरे या गोष्टी प्रकल्पासाठी महत्वपूर्ण असल्याने प्रकल्पाची येथे उभारणी जवळपास निश्चित झाली होती. मात्र त्यानंतर अचानकपणे या प्रकल्पाने लोटेतून बारामतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेथे एमआयडीसीने त्यांना 90 एकर जागा देऊ केली, जागेची शुल्क आकारणीही झाली. प्रकल्प उभारणीला सुरूवात मात्र झाली नव्हती. असे असतानाच कोरोनानंतर बदललेल्या धोरणातून कोकाकोलाने आपला मोर्चा पुन्हा लोटेकडेच वळवला. या प्रकल्पासाठी एमआयडीसीने 90 एकर जागा दिली आहे. अधिक लागल्यास तीही देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकल्प जागेतून तेथील ग्रामस्थांच्या रस्त्याचा प्रश्नही निकालात काढला गेला आहे. प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने एमआयडींसीचे वरिष्ठ अधिकारी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या असगणी, लवेल, दाभिळ व सात्विनगाव परिसरातील 650 हेक्टर क्षेत्रासाठी अनेक उद्योगांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्या उद्योगांना वीज, पाणी, रस्ते, सीईटीपी यासह अन्य सुविधांच्यादृष्टीने कोटय़वधी रूपये खर्चाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. कोका-कोलासाठी लागणाऱया पाण्याची गरज लक्षात घेऊन नव्या पाणी योजनेच्या निविदेत 26 एमएलडीची योजनेचे नियोजनही करण्यात आले आहे.
लोटे विस्तारीत क्षेत्रात 50 एकर जागेवर सध्या रेल्वेच्या रोलिंग स्टॉक कंपोनंट कारखान्याची उभारणी सुरू आहे. या कारखान्यामध्ये रेल्वेचे स्पेअर पार्टस् बनवले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 300 कोटी आहे. त्यामध्ये कोकाकोलाची भर पडत आहे. या दोन्ही प्रकल्पांनी वेळेत आकार घेतल्यास कोकणातील औद्योगिकीकरणाला गती मिळणार आहे.









