अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप, सीबीआय चौकशीच्या आदेशाची याचिकेत मागणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईतून प्रतिमहिना 100 कोटी रुपये मिळवून द्या असा आदेश देण्याचा आरोप महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी याचिकेत केली. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपदावरून आपली बदली केल्याच्या निर्णयालाही त्यांनी आव्हान दिले. याचिकेत त्यांनी देशमुखांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्रातील लेटरबाँबमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला क्षणोक्षणी वेगळे वळण लागत आहे. आता परमबीर सिंग यांच्या याचिकेमुळे हे प्रकरण न्यायालयातही पोहचले. महाराष्ट्र सरकार व अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचारांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश या प्रकरणांमधील पुरावे नष्ट केले जाण्याच्या आधीच द्यावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केल्याने या सर्वच प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय करणार याकडे साऱयांचे लक्ष आहे.
मोहन डेलकर प्रकरणी दबाव
दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या नेत्यांवर कारवाई करावी असा दबाव अनिल देशमुख यांनी आणला होता, असा आरोपही याचिकेत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख विभागांतर्गत बदल्या करतानाही भ्रष्टाचार करतात. त्यांनी फेबुवारीत आपल्या निवासस्थानी सचिन वाझे यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱयांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे 100 कोटीचे लक्ष आपल्याला देण्यात आल्याची भाषा केली. तसेच राज्याचे पोलीस करीत असलेल्या अनेक प्रकरणांच्या तपासातही ते हस्तक्षेप करतात असे अनेक गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी याचिकेत केले आहेत.
पदाच्या गैरवापराचाही आरोप
देशमुख यांनी त्यांच्या पदाचा सर्रास गैरवापर चालविला आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱयांना डावलून ते कनिष्ठ पोलीस अधिकाऱयांना बोलावून घेत असत आणि त्यांना खंडणीखोरीसाठी आदेश देत असत. अशी कृती लोकशाही तत्वांच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. आपण स्वतः त्यांचे गैरप्रकार संबंधितांच्या लक्षात आणून दिले होते. तथापि आपल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट 17 मार्च 2021 या दिवशी आपल्याच बदलीचा आदेश काढण्यात आला, असेही प्रतिपादन त्यांनी याचिकेत केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
संसदेत गदारोळ
परमबीर सिंग यांच्या पत्रावर सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला. भाजपच्या सदस्यांनी हे प्रकरण उचलून धरत निःपक्षपाती चौकशीची जोरदार मागणी केली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदत्याग करावा अशीही मागणी भाजप सदस्यांनी केली. भाजप खासदार राकेश सिंग यांनी उद्धव ठाकरे सरकारच्याच राजीनाम्याची मागणी लोकसभेत केली. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी हे सर्व भाजपचेच कारस्थान असल्याचा आरोप केला. केंद्र सरकार आपल्या तपास संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँगेसचे रवनीत बिट्टू यांनी केला.
पत्रातील मुद्देच याचिकेत
परमबीर सिंग यांनी शनिवारी जे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर नेते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठविले आहे, त्या पत्रातील सर्व मुद्दे या पत्रातही नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे ते पत्र सिंग यांनीच लिहिले व पाठविले होते, यासंबंधी आता शंका उरलेली नाही, असे तज्ञांचे मत आहे.
देशमुखांचा राजीनामा घेणार नाही
अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतली आहे. त्यांचा राजीनामा घेण्याचे कोणतेही कारण नाही असे शरद पवार यांनीच सांगितल्याने तो प्रश्न उद्भवत नाही, अशीही पुस्ती संजय राऊत यांनी यासंबंधी भाष्य करताना जोडली आहे.
एनआयए चौकशीसाठी सज्ज
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्राची माहिती आम्हाला असून हे प्रकरण भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे असल्याचा आरोप असल्याने ते एनआयएच्या कार्यकक्षेतील आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास त्याची चौकशी करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे प्रतिपादन एनआयएच्या अधिकाऱयांनी केल्याने लवकरच ही चौकशी होण्याची शक्यता आहे.









