ना. मुश्रीफ यांनी या मागणीस सकारात्मक निर्णय घेण्याची दिली ग्वाही
प्रतिनिधी / शिरोळ
आगामी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंचायत समिती सदस्यांनाही मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य मल्लाप्पा चौगुले यांनी राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर यांचेकडे केली आहे. नामदार मुश्रीफ यांनी या मागणीस सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी बोलताना मल्लापा चौगुले म्हणाले की २०१७-१८ साली मी सभापती असताना जिल्ह्यातील १२ सभापती, उपसभापती यांच्यामध्ये मेळावा घेण्यात आला होता. विकास कामासाठी एक लाख रुपये रक्कम पंचायत समितीच्या सदस्यांना मिळत होती. यामध्ये विकास काय साधणार यासाठी जास्तीची निधी मिळावा तसेच विधान परिषदच्या निवडणुकीसाठी जसे जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेच्या नगरसेवकांना मतदानाचा अधिकार आहे. इतकेच नाहीतर कर्नाटक राज्यात विधान परिषदेसाठी ग्रामपंचायत सरपंचांना मतदानाचा हक्क आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने सध्या पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेच्या मतदानाचा हक्क मिळावा यासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी चौगुले यांनी केली तसेच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मागणीचे प्रत पाठविल्याचे सांगितले.