प्रतिनिधी / खानापूर
प्रभूनगर येथील वीटभट्टीवर 10 व 12 वर्षांच्या दोन बाल कामगारांचा वापर करून बालकामगार प्रथेला प्रोत्साहन देणाऱया वीट व्यावसायिकाविरुद्ध खानापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी अशोक तेली यांच्या नेतृत्वाखाली महसूल व कामगार खात्याने छापा टाकून बालकामगारांना कष्टाच्या कामात जुंपणाऱया व्यावसायिकावर कायद्याचा बडगा उगारला. मुलांना पुन्हा अशा कामाला न लावता शाळेत पाठविण्याची सक्त सूचना पालकांना केली.
प्रांताधिकारी अशोक तेली हे खानापूर दौऱयावर आले असताना प्रभूनगर या ठिकाणी रस्त्यालगत एका वीटभट्टी लावण्याच्या कामात मुलांचा वापर केला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच त्यांनी बेळगाव येथील कामगार खात्याच्या निरीक्षकांना व पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. 18 वर्षांखालील मुलांना मजुरीची कामे लावणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून वीटभट्टी मालक बसवराज जक्कण्णावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांना सक्त ताकीद देऊन मुलांना वीटभट्टीची कामे लावू नयेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जांबोटी विभागाचे उपतहसीलदार राजेंद्र चव्हाण, महसूल निरीक्षक यमकनमर्डी, तलाठी आर. एस. बागवान, कामगार खात्याच्या ज्योती कांते, बसवराज बेटगेरी आदींनी या कारवाईत भाग घेतला. या कारवाईमुळे तालुक्यातील वीटभट्टी केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात बालकामगारांचा वापर करणाऱया वीट उत्पादकांना हादरा बसला आहे.









