राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा नवा विषय नाही. गुन्हेगारीचा शेवटचा अड्डा असं राजकारणाचं वर्णन केलं जातं आणि त्याचे वास्तव दर्शन गेले काही महिने महाराष्ट्रात होते आहे. मुंबई पोलीस प्रमुख परमबीर सिंग यांनी आपल्या खुर्चीवरुन उतरताना जो लेटरबॉम्ब टाकला आहे त्यामुळे सरकारचं काय अवघे राजकारण हादरले
आहे. त्यांनी या पत्रासोबत व्हॉटस्ऍपचा एक चॅट जोडला आहे. तो तर पोलिसांची, राजकारण्यांची आणि व्यवस्थेच्या चिंध्या करणारी आहे. मंत्री, त्यांचे स्वीय्य सहाय्यक, अधिकाऱयांना कसे लुटतात आणि लूट करायला लावतात याचे दर्शनच या पत्रातून आणि चॅटमधून झाले आहे. खरे तर यानंतर त्यांनी सत्वर राजीनामा द्यायला पाहिजे होता, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी त्यांना तसे सांगायला हवे हेते पण ती सजगता व संवेदना उरलेली नाही. महाराष्ट्रातलेच नव्हे देशातले पोलीस प्रशासन, राजकारण त्यांचे संबंध आणि संघटित गुन्हेगारी व अर्थकारण सर्वानाच ज्ञात आहे. अगदी शाळेचा मास्तर नेमण्यापासून मास्तरची बदली करण्यापर्यत आणि समाजकल्याणचे अनुदान देण्यापासून आश्रमशाळा मंजुरीपर्यत जसे दर आहेत तसे भ्रष्टाचारात बहुचर्चित असलेल्या महसूल आणि पोलीस खात्यातही अनेक गोष्टींचे दर आहेत हे उघड सत्य आहे. त्याची गेली अनेक वर्षे चर्चा आहे. अगदी पदाचे लिलाव निघतात असे म्हटले जायचे. पण, त्याला पुरावा नव्हता. लाच घेताना, देताना एखादा अधिकारी, लिपिक पकडला जायचा पण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून जी माहिती दिली त्यानुसार ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री मुंबई पोलिसाकडून दरमहा 100 कोटी रुपये मागत. त्यांनी 100 कोटीचे उद्दीष्ट देताना मुंबईतील बार आणि नाईट क्लबकडून महिना 3 लाख व इतर गोष्टीतून असे 100 कोटी मागितले होते. अर्थात अनिल देशमुखांनी हा आरोप फेटाळला आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांची गाडी सापडली. त्या तपासाचे धागेदोरे परमबीर सिंग यांचेपर्यंत पोहोचतात त्यांच्याकडून अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्यामुळेच ते खोडसाळ व चुकीचे आरोप करत आहेत, असे देशमुखांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांनी परमबीर सिंग यांची बदली केली आहे. तथापि गृहमंत्री जे सांगत आहेत ते लेटरबॉम्ब इतकेच गंभीर आहे. पोलीस प्रमुख स्फोटकाच्या प्रकरणात गंभीर अक्षम्य चुका करत असेल तर सारी यंत्रणा सडली आहे असे म्हणावे लागेल. पण वास्तव पुढे आले पाहिजे आणि साफसफाई पण झाली पाहिजे. या आरोपातील आणि प्रकरणातील खरे, खोटे वाझे, परमबीर सिंग व अनिल देशमुख यांना माहित त्याच जोडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाआघाडीचे नेते शरद पवार यांनाच माहित असावे. तिघाडीचे सरकार बनवण्यात अग्रेसर असलेले खा. संजय राऊत यांनी ‘हमामखाने मे सब नंगे’ असे जाहीरपणे म्हटले आहे. आणि ते बोलके आहे. याचा अर्थ राजकारण नासलं आहे हे जगजाहीर आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली कार सापडली आणि पाठोपाठ जे धक्क्यामागून धक्के बसत आहेत ते राजकारणाची आणि उद्धव ठाकरे सरकारची अब्रू वेशीवर टांगत आहेत. आता यामध्ये सचिन वाझे व परमबीर सिंग अडकले आहेत व गृहमंत्री अनिल देशमुखही अडचणीत आहेत. त्यांचा राजीनामा मागितला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची धनंजय मुंडेंच्या प्रकरणानंतर पुरती अब्रु गेली होती पण ते प्रकरण रेटून नेण्यात आले. आता गृहमंत्र्यांवर दरमहा 100 कोटीचा जो आरोप झाला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा अडचणीत आली आहे. वाझे आणि परमबीर सिंग हे दोन्ही सरकारी अधिकारी शिवसेना धार्जिणे म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. त्यांच्यावर कारवाई शिवसेनेला शह मानला जात होता. शिवसेना पूजा चव्हाण प्रकरणात मंत्री संजय राठोडमुळे संकटात आली होती. वाझेची मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे पाठराखण केल्यावर वाझेंचे कारनामे पुढे आले असे वाटत असतानाच परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बने शिवसेनेचा शिक्का असलेले सचिन वाझे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्री देशमुखासाठी महिना शंभर कोटी गोळा करत होते असा संशय निर्माण झाला आहे. आता या पत्रातील रक्कम शंभर कोटी असल्याने याची चौकशी इडी मार्फत होणे शक्य आहे. चौकशीला ईडी उतरणेचा संभव आहे हा पैसा कुणाच्या घशात दरमहा जात होता, हे पहावे लागेल नुसत्या मुंबई पोलिसांना 100 कोटींचे उद्दीष्ट मग महाराष्ट्र पोलीस व अन्य खाती व बदल्या, बढत्या, नेमणुका यामध्ये काय? हे जाणून घ्यावे लागेल. हे सरकार महिलांच्या प्रकरणात आणि भ्रष्टाचारात आणि आरोपात अडचणीत आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत बोलावून घेऊन अनिल देशमुखांशी चर्चा केली आहे. आता हा लेटरबॉम्ब कुणाचा बळी घेतो हे बघायचे. महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणात वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकाऱयाने गृहमंत्र्यांवर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले. आजवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांने गृहमंत्र्यांवर लेखी आरोप केला असे झाले नव्हते हे पत्राचे लेटरबॉम्ब असे वर्णन होत असले तरी ते अनेक अर्थांनी धक्कादायक आहे. खालवलेल्या राजकारणाचे निर्देशक आहे. यातून कुणाकुणाची पदे व प्रतिष्ठा जाते हे हळूहळू लक्षात येईल पण या निमित्ताने राजकारण्यांचे हिडीस व लाजिरवाणे दर्शन झाले आहे व ते फारसे शोभादायक नाही. सरकार टिकते न टिकते, तसेच मंत्रीपद टिकते न टिकते हे लवकरच स्पष्ट होईल पण जनतेच्या मनात या सरकारची व मंत्र्यांची व सहभागी पक्षाची जी प्रतिमा निर्माण झाली आहे ती या पक्षांना भोगावी लागणार आहे. वाझे, परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांचे जे चित्र जनतेसमोर उभे आहे. ते निषेधार्ह व निंदनीय आहे. आघाडी सरकारचे कर्तेकरवते यांना पाठीशी घालतील तर ते सुद्धा अडचणीत येतील. मुळात मुकेश अंबानी यांचे घरासमोर स्फोटकांची गाडी का ठेवली होती हे अजून स्पष्ट झाले नाही. तपास करताना जे धमाके उडत आहेत त्याने सिंहासन हलू लागले आहे. पुढे पुढे यातून काय निघते व काय होते ते बघायचे पण सब नंगे हेच खरे. लेटरबॉम्बमुळे एकाची नग्नता जाहीर झाली बाकी चिडीचूप आहेत. लोकशाही व राजकारण, समाजकारण याला ग्रहण लागले आहे. जनतेने चांगले प्रतिनिधी निवडले पाहिजेत. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा या दृष्टचक्रातून राजकारण फिरते आहे. कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. उडदामागे काळे-गोरे पण या प्रकरणात राजकारणाचे, राजकीय पक्षांचे व वरिष्ठ अधिकाऱयांच्या वर्तनाचे जे चित्र जनतेसमोर आले आहे तसे यापूर्वी आलेले नव्हते. पण तुर्त सब नंगे हेच खरे.
Previous Articleसांगली : तिकोंडीत गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान
Next Article महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे आंदोलन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.