11 शतकांपासूनचा इतिहास चोपडीत बंद
दीपक बुवा/ बेळगाव
आपले मुळ कोणते?, आपले पूर्वज कोण?, आपल्या घराण्यातील किती पिढय़ा होवून गेल्या? याचे औत्सुक्य प्रत्येकाला असतेच. सरकार दरबारी फक्त आपली जन्मतारीख कळू शकते. परंतु त्यापेक्षा अधिक माहिती किंवा आपल्या पूर्व परंपरेबद्दल कोणतीच माहिती मिळणे तसे कठीण असते. परंतु अशी माहिती संकलन करुन त्याची नोंद ठेवणारे हेळवी आजच्या आधुनिक जगातही गावोगावी फिरुन माणसांचे औत्सुक्य शमवत आहेत.
संगणक नाही कोणतेही दफ्तर नाही आणि कार्यालय नसताना देखील 11 शतकापांसून पिढयान पिढयाच्या इतिहासाची नोंद मात्र हेळव्यांच्या दफ्तरात आढळते. ही नोंद ठेवण्यासाठी त्यांना कोणतेही मानधन मिळत नाही. वर्षातून एकदा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या वंशावळीची माहिती सांगून खुशालीवर समाधान मानणारा हेळवी समाज आज ही वडिलोपार्जित परंपरा टिकवून ठेऊन आहे. वर्षातील काही महिने सुगीच्या दिवसात प्रत्येकाच्या घरात जाऊन वंशावळी सांगणाऱया हेळवी आजही समाजाला आदर्शच वाटतात. अशाच हेळवी बिऱहाडांचे बेळगाव परिसरात आगमन झाले आहे.
नागरिकांना आपल्या पुर्वजांची वंशावळी सांगण्याचे महत्वाचे काम हेळवींकडून होते. 11 शतकांपासूनची सर्व माहिती या हेळव्यांकडे उपलब्ध आहे. पिढयानपिढया मोडी भाषा, मराठी भाषा आणि कन्नड भाषेतून हजारो वर्षे जपून ठेवलेली माहिती हेळव्यांच्या तोंडून ऐकताना नागरिक ही गतकाळात हरवून जातात. प्रत्येकालाच आपले आजोबा किंवा पणजोबा पर्यंत ची माहिती उपलब्ध असते. पण त्याआधीची माहिती उपलब्ध होत नाही. अशावेळी ती माहिती जाणून घेण्याचे औत्सुक्य सर्वांनाच असते. त्यामुळेच हेळवी घरी येताच घरातील सर्व मंडळी आपली वंशावळ ऐकण्यास उत्सुक असतात.
सध्या संगणकाच्या युगात एखाद्या ऑप्शनवर क्लिक केले असता जगभरातील सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते. पण कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसताना देखील वडिलोपार्जित चोपडीत जपून ठेवलेली सर्व माहिती सांभाळुन ठेवणे तसे जिकीरीचे काम पण हेळवी समाज सर्व समस्यांचा सामना करीत आजही आपली परंपरा टिकवून आहेत. एखाद्या सरकारी कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला सर्वच माहिती उपलब्ध होते असे नाही. पण हेळवींकडे उपलब्ध असणारी माहिती अतिशय चोख असते. बेळगाव जिल्हयातील अनेक ठिकाणी हेळवी समाजाचे नागरिक राहतात. नदी पात्राजवळ हा समाज वस्ती करुन राहतो. सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसताना देखील नागरिकांकडून जे काही मिळेल त्यातून आणि वडिलोपार्जित शेती मधून जे काही पीक मिळेल त्याच्यावरच या समाजाला आपला गाडा चालवावा लागतो.
सरकारी दरबारी अनेकदा मागणी करुनही या समाजाच्या विकासासाठी कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. 1153 पासून आपल्याकडे बेळगाव कोल्हापूर, विजापूर आदि भागातील नागरिकांची इत्यंभूत माहिती या हेळवींकडे उपलब्ध आहे. एखाद्यी आवश्यक असलेली माहिती मिळत नसल्यास हेळवींकडे असलेली माहिती न्यायालयात ग्राहय़ मानली जाते इतका विश्वास हेळवीकडे असणाऱया माहितीवर ठेवला जातो.
नागरिकांच्या घरी जाऊन आपल्या वेगळया भाषाशैलीत नागरीकांची वंशावळी सांगण्याचे काम हेळवी समाजातील लोक पिढयानपिढया करीत आले आहेत. काही वर्षापूर्वी नागरिक लोक परंपरेला अतिशय महत्व देत होते. सध्या हेळवी समाजाला वाढत्या महागाईत घरखर्च चालवणे जमत नाही. या समाजातील जादातर युवक वेगळा व्यवसाय करण्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे यापुढे ही परंपरा कोण चालविणार असाच प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून या परंपरेशी निगडीत असणाऱय़ा काहीजणांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना व्यक्त केला.
सिध्दाप्पा बाबुराव हेळवी
गेल्या 10 ते 15 वर्षांपासून हेळवी म्हणून अनेक जिल्हयांचा प्रवास करतो. आज काल परिस्थिती फारच बदललेली आहे. वर्षातील 4 महिने तीन चार जिल्हयांचा प्रवस करतो. आपली वंशावळ ऐकण्यास बरीच मंडळी उत्सुक असते. आपण कोणाकडेही इतकीच रक्कम द्या म्हणून मागत नाही. वडिलोपार्जित चोपडी अतिशय व्यवस्थित जपून ठेवावी लागते. कारण बरीचशी माहिती मोडी भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे जुणी चोपडी(वही) अतिशय महत्वाची ठरते असे सिद्दू हेळवी म्हणाले.
केंपान्ना हेळवी
30 वर्षांपासून हेळवी म्हणून नागरिकांना परिचित आहे. घर, शेती सांभाळत परंपरा म्हणून हे काम करावे लागते. सध्या नवीन पिढी या कामात विशेषतः लक्ष देत नाही. मोडी भाषा वाचणारे ही कमी झाले आहेत. अशावेळी ही परंपरा यापुढे टिकवून ठेवणें अतिशय जिकिरीचे ठरणार आहे. परंपरा टिकावी हीच आपली इच्छा आहे. आजही नागरिकांना आपल्या वंशावळीबाबत कुतुहूल असते. त्यामुळेच आजही समाजात आपल्याला मान आहे. असे मत भालचंद्र यांनी व्यक्त केले.