लखनौ / वृत्तसंस्था
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा एकदा आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनौ शताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या लगेज (माल) बोगीत आग लागली. याआधी 13 मार्च रोजी दिल्लीहून देहरादूनला जाणाऱया शताब्दी एक्स्प्रेसमध्ये लाग लागल्याची घटना समोर आली होती. आगीसंबंधीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाडय़ा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीच्या दुर्घटनेमुळे रेल्वेस्थानकावरच मोठा गोंधळ उडाला. आगीने पाहता पाहता रौद्ररुप धारण केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील सिंह यांची दिली. एक्स्प्रेसच्या मागील बाजूस असलेल्या जनरेटर आणि लगेज बोगीत ही आग लागली होती. तत्काळ इतर बोगींना वेगळे करण्यात आल्याने अन्य बोगींमध्ये आग पसरली नाही. तसेच या दुर्घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.