लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, शस्त्र जप्त, एकाला अटक : 13 ठिकाणी पोलिसांनी केली कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी काळय़ा यादीतील गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकले. या कारवाईत जांबिया, तलवारी, एअरगनसह शस्त्र जप्त करण्यात आली असून एकूण 13 ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बेकायदा शस्त्र बाळगणाऱया किट्टू रजपूत याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुनशी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली.
उपलब्ध माहितीनुसार पोलिसांनी सुमारे 13 जणांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली आहे. पोलिसांच्या कारवाई आधीच एक तरुण फरारी झाला असून उर्वरित काळय़ा यादीतील गुन्हेगारांची चौकशी करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कपिलेश्वर मंदिराच्या पाठिमागे असलेल्या रमेश उर्फ अम्मू काशी जालगार, रवी काशी जालगार, कपिल रमेश भोसले (रा. तांगडी गल्ली), शशी संजय जालगार (रा. कपिलेश्वर मंदिरामागे), राहुल संजय जालगार (कपिलेश्वर मंदिरामागे), प्रफुल्ल बाळकृष्ण पाटील (रा. चव्हाट गल्ली), विनायक गोपाळ कांगले (रा. पाटीलमळा), विशालसिंग विजयसिंग चव्हाण (रा. शास्त्राrनगर), फईम उर्फ फयुम जैलानी उर्फ जिलाणी कोतवाल (रा. खंजर गल्ली), सागर उर्फ छोटय़ा अशोक जानगवळी (रा. नानावाडी), अताउल्ला महम्मदरसुल किल्लेदार (रा. चांदू गल्ली), समीर अल्लाबक्ष किल्लेदार (रा. चांदू गल्ली), किट्टू उर्फ गणेश जोगेंदरसिंग रजपूत (रा. कपिलेश्वर मंदिरामागे) यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
अनेक ठिकाणी खुनी हल्ला केल्याप्रकरणी यापूर्वी खडेबाजार पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या जामीनावर असलेल्या विशालसिंग चव्हाण हा पोलिसांच्या हातात सापडला नाही. तर किट्टू रजपूत (वय 42) याच्या घरात तपासणीच्यावेळी घातक शस्त्रs आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
किट्टू रजपूतवर 25(1),(ए),(बी) इंडियन आर्म्स ऍक्ट 1959 व 97 कर्नाटक पोलीस कायदा 1963 अन्वये एफआयआर दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील वेगवेगळय़ा भागांत पोलिसांनी काळय़ा यादीतील गुन्हेगारांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली असून लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









