ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीनअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने आदेश दिले आहेत. आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र यातून वगळण्यात आले आहे.

तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनांमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयाच्या प्रवेश दारावर तापमान तपासण्यात येईल. प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक असणार आहे. शासनाने काढलेला हा आदेश 31 मार्चपर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे.
यासह नाट्यगृहे आणि सभागृहे यांमधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी, तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.








