प्रतिनिधी / बेळगाव
मारिहाळ पोलिसांनी एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून त्याच्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. परशराम विलास तहसीलदार (वय 33, रा. गांधीनगर, पहिला क्रॉस, खानापूर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 2 लाख रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले. मारिहाळचे पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. परशरामने आणखी कोठे चोरी केली आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.









