नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचे नाव सध्या देशभरात चांगलेच चर्चेत आहे. फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे वक्तव्य रावत यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यांवर सर्व स्तरातून टीका होत आहे. देशभरातील महिला वर्ग असेल की महिला नेत्या या सर्वांनी रावत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वधेरा यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपवर टीका केली आहे.
तिरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्स बाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रियांका गांधी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये भाजप नेते नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यामध्ये हे तीनही नेते संघाच्या जुन्या गणवेशात दिसत आहेत. ज्यावेळी हाफ पँट हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या गणवेशाचा भाग होता त्यावेळीचा हा फोटो आहे. हा फोटो पोस्ट करत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, ‘ओएमजी यांचे गुढगे दिसत आहेत’.
यापूर्वी तिरथ सिंह रावत यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी , शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी रावत यांना ट्विटरवरून लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर देखील रावत यांच्याबरोबच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका केली जात आगे.