शिमगोत्सवाला गालबोट लागू नये, याची दक्षता घेणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. शिमगोत्सवाचे संचित जपण्यासाठी गोमंतकीयांनी पुढे यावे तरच गोव्यातील शिमगोत्सव उत्तरोत्तर बहरास येईल.
गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. रुग्णसंख्या पुन्हा वाढतच आहे. सध्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लस देण्यात येत असली तरी अजूनही या लसीसंदर्भात गोंयकारांमध्ये गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी यासंबंधी जागृती होणे आवश्यक आहे. गोव्यात सध्या पालिका निवडणूक तसेच जि.पं. व ग्रा.पं. पोटनिवडणुका याच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचाराला जोर धरलेला आहे. याच्या जोडीला आता शिमगोत्सवी राजवट सुरू होणार आहे. शिमगोत्सवावर यंदाही कोरोना महामारीचे सावट आहे. त्यामुळे बऱयाच ठिकाणी उत्सव मर्यादित स्वरुपात, तर काही ठिकाणी कोरोनासंदर्भातील नियम पाळून होणार आहेत. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जगदंब ढोल-ताशा पथक गोवातर्फे ढोल-ताशा प्रशिक्षण कार्यशाळा कुर्टी-फोंडा येथील पशुसंवर्धन गेस्ट हाऊसजवळ मोफत आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल या पथकाला धन्यवाद द्यावे लागतील. गोवा राज्यातील श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा श्री अवतार पुरुषाचा कौल, अवसर, तळया, वीरामेळ, शिमगोत्सव, दिवजोत्सव व शिमग्याची जत्रा प्रसिद्ध आहे. येत्या 28 मार्चपासून अन्य गावात होळी पेटविल्यानंतरच पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. होळी पेटविल्यानंतर गावागावात ‘शबय, शबय’ व ढोल-ताशांच्या ‘घुमचे कटर घुम’ निनादासह शिमग्याचा उत्साह काही गावात संचारणार आहे. काही भागात 5 तर काही ठिकाणी 7 ते 9 दिवस शिमगा पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धुलीवंदन, चोरोत्सव, रोमट आदी पारंपरिक प्रकार त्या-त्या भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. शिमगोत्सवानिमित्त आता गावागावात ढेल-ताशांची दुरुस्ती तसेच जमवाजमव सुरू झाली आहे. सरकारी पातळीवरील शिमगोत्सवाला येत्या दि. 30 मार्च रोजी फोंडय़ातून प्रारंभ होत आहे. पर्यटन खात्यामार्फत यंदा राज्यातील 3 ठिकाणी शिमगोत्सवानिमित्त मिरवणुका निघतील. कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे शिमगोत्सव मिरवणुकांवर यंदा अनेक निर्बंध आलेले आहेत. अशावेळी गोव्यात केवळ 3 ठिकाणी शिमगोत्सव मिरवणुका होतील. त्यात फोंडा येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल. दि. 30 रोजी फोंडा, दि. 3 एप्रिल रोजी पणजी व दि. 4 एप्रिल रोजी म्हापसा येथे शिमगोत्सव मिरवणुकीने राज्यस्तरीय शिमगोत्सवाची सांगता होईल. चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य, वेषभूषा अशा विविध स्पर्धांची यात रेलचेल असेल.
गोमंतकीय शिमगोत्सवाला मोठी परंपरा लाभलेली आहे. याद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. दरवर्षी गोव्यात हा उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होणारे चित्ररथ रसिकांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारे असतात. बेधुंद नृत्य करणारी रोमटामेळ पथके, लक्षवेधी घोडेमोडणी नृत्य, प्रत्येक पथकाच्या पोषाखातील विविधता आदींमुळे हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटतो. गोव्याची पारंपरिक वेषभूषा, विविध पौराणिक कथानकांवर आधारित चित्ररथ व हलते देखावे यामुळे रसिकांना गोव्याची संस्कृती व लोककलेचे दर्शन घडणार आहे. पेडणेपासून काणकोणपर्यंत शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. शिमगोत्सव म्हणजे लोकगीत, लोकसंगीत, ऐतिहासिक वारसाची महती सांगणारा त्याचप्रमाणे परंपरेने जोपासलेला लोकविश्वास, श्रद्धा यांच्या बळावर आजवर टिकून असलेल्या शिमगोत्सवाची रुपे अनंतकाळपर्यंत टिकावीत व भावी पिढीला त्याची ओळख घडावी, या हेतूने हे संचित जपणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे.
शिमगोत्सव काळात डिचोलीतील बोर्डे, पिळगाव, कुडणे, कारापूर आदी काही ठरावीक भागात पारंपरिक पद्धतीने गडे उत्सव साजरा करण्यात येतो. साळ गावातील गडे उत्सव प्रसिद्ध आहे. या गडे उत्सवाला नावलौकिक प्राप्त झाला आहे. 3 दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. शिमगोत्सवात काही भागात पारंपरिक लोकनृत्य असलेल्या घोडेमोडणी प्रकारामध्ये लोककलेचे दर्शन घडते. विदेशी पर्यटकांनाही गोमंतकीय शिमगोत्सव आकर्षित करीत आहे.
गोवा म्हटले म्हणजे जणू ‘खा, प्या, मजा करा’ अशी ओळख. गोव्याला समुद्रकिनाऱयावरील संस्कृती असल्यामुळे संगीत रजनी, पाटर्य़ांचा सुकाळ, अमलीपदार्थ व्यवसाय, मद्यालये आदी बाबींमुळे ही ओळख निर्माण होणे साहजिकच आहे. या पलीकडेही या ठिकाणी संस्कृती नांदते, हे जगासमोर सिद्ध करणे आज गोमंतकीयांची जबाबदारी आहे. अशाप्रकारच्या उत्सवातून हे सहज शक्य आहे.
एकीकडे गोव्यात गोमंतकीय संस्कृती गुण्या-गोविंदाने नांदत असताना कार्निव्हलसारखा प्रकार गोव्यावर लादला गेला आहे. गोव्यातील राष्ट्रप्रेमी नागरिक समितीने अनेकवेळा याचा निषेध केला. कोरोना काळात सनबर्नसारखा फेस्टिव्हलही गोमंतकीयांवर लादण्याचा प्रयत्न झाला, मात्र विरोधी घटकाने पेलेल्या जोरदार विरोधामुळे सरकारचा प्रयत्न फोल ठरला. गोमंतकीय संस्कृतीला पोषक नसणारे महोत्सव गोव्यात आणून गोमंतकीय संस्कृती बिघडविण्याचे कार्य गोवा सरकारकडून होत आहे, हे दुर्दैव आहे. गोवा सरकारने यापुढे ही चूक सुधारणे आवश्यक आहे अन्यथा भावी पिढीला याचे परिणाम निश्चितच भोगावे लागतील.
गोव्यातील किनाऱयांवर डीजेच्या तालावर केवळ नंगानाच होत नाही तर याठिकाणी फुगडी, भजन, नाटके, तियात्र, धालो, ओव्या तसेच विविध संस्कृतीप्रधान सण, उत्सवही होतात. गोमंतकीय संस्कृतीचा उदोउदो होतो, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. शिमगोत्सव, नाटके तसेच अन्य लोकसंस्कृती जपणारे उत्सव गोवा राज्यात टिकले तरच गोंयकारपण खऱया अर्थाने शाबूत राहणार आहे. हे संचित जपण्यासाठी सरकारने तसेच विविध क्षेत्रातील गोमंतकीय कलाकारांनी आतापासूनच कार्यरत राहणे गरजेचे आहे. शिमगोत्सवाला गालबोट लागू नये, याची दक्षता घेणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. शिमगोत्सवाचे संचित जपण्यासाठी गोमंतकीयांनी पुढे यावे तरच गोव्यातील शिमगोत्सव उत्तरोत्तर बहरास येईल, यात शंका नाही.
राजेश परब








