सायलेन्स वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता मनोज वाजपेयीची मोस्ट वाँटेड सीरिज ‘द फॅमिली मॅन’च्या दुसऱया सीझनची चाहते अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. द फॅमिली मॅन 2 चे प्रदर्शन सध्या काही दिवसांसाठी टाळण्यात आले आहे. पण मनोज वाजपेयीची नवी सीरिज ‘सायलेन्स कॅन यू हियर इट’चा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. झी5 वर प्रदर्शित होणारी ही गुन्हय़ांवर आधारित सीरिज असून यात मनोज वाजपेयी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे.
सायलेन्समध्ये एका महिलेच्या रहस्यमय पद्धतीने बेपत्ता होण्याची कथा दर्शविण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अबन भरुचा देवहंस यांनी केले आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीसह प्राची देसाई आणि अर्जुन माथूर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. तर साहिल वैद्य, वकवेर, बरखा सिंग, शिरीश शर्मा, सोहिला कपूर, अमित ठक्कर आणि गरिमा याग्निकही या सीरिजमध्ये अभिनय करत आहेत. 26 मार्च रोजी ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.









