झारग्राममध्ये ममतांचा आरोप – जीवनात अनेकदा मारहाण
वृत्तसंस्था/ झारग्राम
पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये प्रचार करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत अनेकदा आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला आहे. पूर्वी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मारायचे आणि आता हेच काम भाजपचे नेते करत आहेत. पण माकपचे सदस्यच आता भाजपमध्ये गेले आहेत असा दावा ममतांनी व्हिलचेअरवरून सभेला संबोधित करताना बुधवारी केला आहे.
10 मार्च रोजी नंदीग्राममध्ये जखमी झाल्यावर ममता याला स्वतःवरील हल्ल्याचा कट ठरवत आहेत. भाजप नेत्यांनी जाणूनबुजून ममतांवर हल्ला करविल्याचे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे आहे. पण विविध अहवालांच्या आधारावर निवडणूक आयोगाने हल्ल्याचा दावा खोडून काढत याला केवळ एक दुर्घटना ठरविले आहे.
बंगालच्या निवडणुकीदरम्यान मी घरातच बसून रहावी, सभांमध्ये मला सहभाग घेता येऊ नये याकरता भाजपच्या लोकांनी मला ईजा पोहोचविली आहे. भाजपचे लोक माझा आवाज दडपू शकत नाहीत. आम्ही या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्करायला लावणार आहोत असे ममता म्हणाल्या.
निवडणुकीपूर्वी ममतांच्या अनेक सहकाऱयांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यात सुवेंदु अधिकारी, मुकुल रॉय आणि राजीव बॅनर्जी यासारखे नेते सामील आहेत. या नेत्यांचा नामोल्लेख न करता ममतांनी त्यांना लक्ष्य केले आहे. काही विश्वासघाती आणि हपाललेले लोकच भाजपमध्ये सामील झाले असून जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकविणार असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
..अन्यथा जय श्रीराम म्हणावे लागणार
जय श्रीराम नाऱयावरूनही ममतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या निवडणुकीत भाजपला मत देऊ नका, भाजपला मत दिल्यास तुम्हाला स्वतःच्या ‘धर्मा’चे पालन करता येणार नाही. तुम्हाला जय श्री राम म्हणावेच लागेल, तुम्ही जय सिया राम म्हणू शकणार नाही. भगवान राम दुर्गामातेची पूजा करायचे असे म्हणत ममतांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
1990 मध्ये हल्ला
माकपच्या एका तरुण नेत्याने 1990 मध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर वार केला होता, या हल्ल्यामुळे ममतांनी महिनाभर रुग्णालयात रहावे लागले होते. या हल्ल्यानंतर ममता बॅनर्जी कणखर नेत्या म्हणून उदयास आल्या होत्या. याचप्रकारे 1993 मध्ये काँग्रेसमध्ये असताना ममतांना एका मोर्चाचे नेतृत्व करण्यादरम्यान पोलिसांनी मार दिला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात युवा काँग्रेसचे 14 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीत जखमी बॅनर्जी यांना अनेक आठवडय़ांपर्यंत रुग्णालयात रहावे लागले होते.









