अवैधरित्या होतोय वाळूचा उपसा; महसूल मात्र सुस्तच
प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा तालुक्यातील कृष्णा व उरमोडी या दोन नदीपात्रातून वाळूमाफियांकडून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. रात्रीच्या वेळी हा वाळू उपसा केला जात असून, यातून बक्कळ कमाई वाळूमाफीय करत आहेत. मात्र, महसूल विभाग सुस्तच असलेला दिसत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.
सातारा तालुक्यातुन कृष्णा व उरमोडी या दोन नद्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून हरित लवादाने या नदीपात्रातील अधिकृत वाळू उपश्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या प्रशासनाने आद्यप या नदीपात्रातील वाळू उपश्याचे टेंडर काढले नाही. सध्या बांधकामाला वाळूची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे काही वाळूमाफीये सक्रिय झाले आहेत.
सातारा तालुक्यातून कृष्णा व उरमोडी नदी ज्या-ज्या गावांमधून जात आहे, त्यापैकी काही ठिकाणी वाळूमाफियांनी चोरून वाळू काढण्याचा धंदा सुरू केला आहे. या नदीपात्राबरोबरच डोंगर भागातून वाहणाऱ्या ओढ्यांमधील वाळूही यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. रात्रीच्या वेळी जेसीबी, यांत्रिक यारी व गाढवांचा सहाय्याने चोरटी वाळू मोठ्या प्रमाणात काढली जात असून, एका विशिष्ठ ठिकाणी त्याचा साठा केला जात आहे. तेथून ही वाळू लागलीच ट्रकमध्ये भरून ऑर्डर असेल त्या ठिकाणी रात्रीच पोहच केली जात असल्याची माहिती मिळते. सर्व कारभार रात्रीच्या २ ते ३ तासातच उरकला जात आहे.
वाळूचा उपसा अश्या प्रकारे सुरू असतानाच महसूल विभाग मात्र सुस्तच असल्याचे दिसत आहे. अद्यापपर्यंत अशा चोरट्या वाळूउपश्यावर महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नाही.त्यामुळे या अवैध वाळू उपशाबाबत महसूल खाते अनभिज्ञ आहे ? की जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे? याची चर्चा सध्या सुरू आहे. या वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभाग आवळणार का? असा प्रश्न नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.