नामवंत वकिलांच्या लौकिकाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
तंत्रज्ञानाचा विस्तार जसा वाढतो आहे, तसा त्याचा गैरफायदाही वाढतो आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी आयपीएस अधिकाऱयांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्यांच्या नावे पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. असेच प्रकार पुन्हा सुरू झाले असून बेळगाव येथील ऍड. संग्राम कुलकर्णी यांनाही याचा फटका बसला आहे.
शनिवार दि. 13 मार्च रोजी ऍड. संग्राम यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. त्यानंतर अनेकांना प्रेंड रिक्वेस्ट पाठवून सरळ सरळ पैशांची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात येताच ऍड. संग्राम यांनी सीईएन विभागाकडे तक्रार केली असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
शनिवारी दिवसभरात सुमारे 500 जणांना मेसेज पाठवून त्यांच्याकडे 10 ते 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. वकिलीच्या क्षेत्रात ऍड. संग्राम यांचा लौकिक आहे. याचा वापर भामटय़ांनी स्वतः पैसे मिळविण्यासाठी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.
ऍड. संग्राम यांनी आपल्या मित्र परिवाराला यासंबंधी माहिती देत आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. आपण सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे. या अकाउंटवरून येणाऱया प्रेंड रिक्वेस्टला कोणीही प्रतिसाद देऊ नये आणि कोणी पैसे देऊ नयेत, अशी पोस्ट टाकली आहे.
सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. बेळगावात असे अनेक प्रकार घडले आहेत. यासंबंधी ‘तरुण भारत’ने ऍड. संग्राम कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता हॅकर्सनी सुमारे 500 जणांकडे पैशांची मागणी केली आहे. कोणीही पैसे देऊ नये, असे आवाहन आपण केले आहे. रविवारी रात्रीपर्यंत तरी हॅकर्सना कोणी पैसे दिले नाहीत, असे त्यांनी सांगितले.









