एका कबुतरासाठी पोलीस अधिकाऱयाची कुटुंबासह धावाधाव
प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या घराच्या व्हरांडय़ात पडलेल्या कबुतराला जीवदान देण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पोलीस अधिकारी असणारे पती, दहावीत शिकणारा मुलगा या साऱयांनीच त्या कबुतरासाठी धावाधाव केली. त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. त्या कबुतराचा शेवटी अंत झाला.
रविवारी सहय़ाद्रीनगर परिसरात ही घटना घडली. रेल्वे विभागाचे मंडल पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या घराच्या व्हरांडय़ात रविवारी सकाळी एक कबूतर विव्हळत पडले होते. शिक्षिका असणाऱया त्यांच्या पत्नी बी. जे. कालीमिर्ची यांना त्याची तडफड पाहवली नाही. तातडीने त्याला उचलून पाणी पाजले.
पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची सुटीनिमित्त रविवारी घरीच होते. त्यांनीही त्या कबुतरावर उपचारासाठी पुढाकार घेतला. दहावीत शिकणारा मुलगा नबानला पशुसंगोपन खात्याच्या दवाखान्याला पाठविले. स्वतः वरि÷ अधिकाऱयांशी बोलून त्या अत्यवस्थ कबुतरावर उपचाराची विनंती केली.
रविवारी पशुसंगोपन खात्याचा दवाखाना अर्धा दिवस सुरू होता. वेळेत कबुतरावर उपचार झाले नाहीत. थोडी प्रतीक्षा केल्यानंतर त्या कबुतरावर औषधोपचार झाले. त्याला परत घरी नेताना वाटेतच ते दगावले. अत्यवस्थ होऊन घराच्या व्हरांडय़ात पडलेल्या कबुतराला वाचविण्यासाठी पोलीस अधिकाऱयाच्या कुटुंबीयांनी केलेली यातायात शेवटी वाया गेली.









