वृत्तसंस्था/ अबु धाबी
फिरकी गोलंदाज रशीद खानच्या 11 बळींच्या जोरावर रविवारी येथे अफगाणने दुसऱया कसोटीत झिंबाब्वेचा 6 गडय़ांनी पराभव करत ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली. या सामन्यात रशीद खानने 325 धावांत 11 गडी बाद केले. तसेच रशीद खानने 21 व्या शतकामध्ये कसोटीत सर्वाधिक षटके टाकण्याचा विक्रम केला आहे.
रशीद खानने 2018 साली पहिल्यांदा भारताविरूद्ध आपली पहिली कसोटी खेळली होती. या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत झिंबाब्वेने अफगाणला विजयासाठी 108 धावांचे किरकोळ आव्हान दिले. अफगाणने 4 गडय़ांच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठत ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. 22 वर्षीय रशीद खानने 2019 साली बांगलादेशविरूद्ध 11 गडी बाद केले होते. रशीद खानने झिंबाब्वेच्या दुसऱया डावात 137 धावांत 7 गडी बाद केले. या सामन्यात त्यांनी 325 धावांत एकूण 11 बळी मिळविले आहेत. रशीद खानची ही सहावी कसोटी आहे.
झिंबाब्वे विरूद्धच्या दुसऱया कसोटीत अफगाणने 4 बाद 545 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येवर अफगाणने डावाची घोषणा केली. अफगाण संघातील शाहिदीने नाबाद 200 धावा झळकविल्या तर कर्णधार अफगाणने 164 धावांचे योगदान दिले. या मालिकेतील पहिली कसोटी झिंबाब्वेने दोन दिवसात जिंकली होती. या दुसऱया कसोटीत झिंबाब्वेने दुसऱया डावात चिवट फलंदाजी केली. कर्णधार सीन विल्यम्सने 151 धावा जमविल्या. त्याने टिरिपानो समवेत आठव्या गडय़ासाठी 187 धावांची भागिदारी केल्याने झिंबाब्वेने डावाचा पराभव टाळला. टिरिपानोने 95 धावा जमविल्या. झिंबाब्वेचा दुसरा डाव 365 धावांवर आटोपला.
अफगाणचा फिरकी गोलंदाज रशीद खानने रविवारी झिंबाब्वेविरूद्धच्या दुसऱया कसोटीत सर्वाधिक षटके टाकण्याचा विक्रम केला आहे. त्याने या कसोटीत 99.2 षटकांची गोलंदाजी केली आहे. 1998 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटके एका सामन्यात टाकण्याचा हा विक्रम आहे. 1998 साली लंकेच्या मुरलीधरनने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात 113.5 षटके गोलंदाजी केली होती.
संक्षिप्त धावफलक
अफगाण प. डाव 4 बाद 545 डाव घोषित (शाहिदी नाबाद 200, अफगाण 164), झिंबाब्वे प.डाव 287, झिंबाब्वे दु. डाव सर्वबाद 365 (विल्यम्स नाबाद 151, टिरिपानो 95, रशीद 7-137), अफगाण दु. डाव 4 बाद 108.









