-आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांची माहिती
प्रतिनिधी/कोल्हापूर
आम आदमी पक्षाने दिल्लीतील सरकारी शाळा,सरकारी रुग्णालये दर्जेदार बनवली आहेत.पार्किंग, प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. दिल्ली विकासाचे हे मॉडेल कोल्हापूरात राबवण्यात येणार आहे अशी माहिती आपचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक रविवारी कोल्हापुरात आले होते.यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिल्लीत विकास केला आहे. सरकारी शाळा, दवाखान्यांचा दर्जा सुधारुन मोफत सुविधा दिल्या जात आहेत. दिल्लीतील विकासाचे मॉडेल घेऊन आप कोल्हापूरात काम करणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीत पक्ष सर्व जागा लढवणार आहे. पक्षाने दिल्लीत केले ते काम राजर्षी शाहूंच्या भूमीत करायचे आहे .येथील महापालिकेच्या शाळा, दवाखाने सुसज्ज करण्याबरोबर महापालिकेचे सर्व दाखले घरपोच देण्याची सुविधा राबवणार. घरफाळयामध्ये आकारणी व वसुलीची पध्दत सुधारुन सोपा व सुलभ घरफाळा आणणार.या व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणार. पार्किंगचे योग्य नियोजन करणार.
आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी वीजबीलावरुन राज्य सरकारवर टीका केली. अधिवेशनात उपमुख्यंमत्र्यांनी वीजबीलात सवलत देण्याची घोषणा केली तर अधिवेशनानंतर उर्जामंत्र्यांनी वीजबील माफ करणार नसल्याचे जाहीर केले.यामुळे हे सरकार दुटप्पी आहे. कोल्हापूरची जनता आपला निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापालिका निवडणूक प्रचार प्रमुख संदीप देसाई म्हणाले,महापालिकेतील राजकारण आता फक्त नेत्यामधील नुरा-कुस्ती पर्यंत मर्यादित झाले आहे.पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वादावर त्यांनी टीका केली. पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष किशोर मंध्यान,राज्य सचिव धनंजय शिंदे,जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर,युवाध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते.
महापौरपदाची खांडोळी थांबवणार-
कोल्हापूर महापालिकेत महापौरसह अन्य पदांची खांडोळी करण्यात आली आहे.तीन ते सहा महिन्याने पदे बदलली जातात.यामुळे विकासाचे निर्णय घेता येत नाहीत.आपची सत्ता आल्यास महापालिकेतील पदांची खांडोळी थांबवणार अशी माहिती दुर्गेश पाठक यांनी दिली.









