प्रतिनिधी / वाई
यशवंतनगर (वाई) येथील महाविद्यायीन युवतीचा विनयभंग करीत तीला व तिच्या मावशीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पिडीत युवतीने आज वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. राहुल अमर घाडगे (रा. लाखानगर, वाई) असे त्या संशयीत इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, पिडीत युवती यशवंतनगर येथील रहात्या घरासमोर उभी असताना तिच्या परिचयाचा राहुल अमर घाडगे हा दारू पिलेल्या अवस्थेत हातात कोयता घेवून तिच्या जवळ आला व तिचा हात पकडून मला तू खूप आवडतेस, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी मुलीने आरडा ओरडा केल्याने शेजारीच राहणारी तिची मावशी बाहेर येवून त्याला जाब विचारला असता घाडगे याने हातातील कोयता दाखवित तुम्हा दोघींनाही या कोयत्याने मारून टाकीन अशी धमकी दिली. यावेळी पिडीत युवतीची आज्जी बाहेर येवून तीने घाडगे याला हाकलून लावले.
याबाबतची फिर्याद पिडीत युवतीने वाई पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीसांनी राहूल घाडगे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. पी. कदम करीत आहेत.