निवडणूक प्रणालीत बदलासाठी मतदान : चीनची पकड अधिक मजबूत
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनच्या संसदेने गुरुवारी हाँगकाँगच्या निवडणूक प्रणालीत बदलांसाठी मतदान केले आहे. या बदलांमुळे हाँगकाँगमध्ये चीनची पकड अधिक मजबूत झाली आहे. चिनी शासन आता स्वतःला वाटेल तेव्हा कुठल्याही उमेदवाराचा अर्ज रद्द करू शकते, याचबरोबर विधान परिषद सदस्याला अपात्र घोषित करू शकते. हा कायदा लागू झाल्यावर हाँगकाँगमध्ये आता चीनच्या पसंतीचेच सरकार सत्तेवर राहणार आहे. चीनने या कायद्याचा बचाव करत यामुळे पूर्ण शक्ती हाँगकाँगच्या देशभक्त सैन्याच्या हातात राहणार असल्याचे म्हटले आहे.
चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने मागील वर्षीच हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करत अनेक लोकशाहीसमर्थक नेत्यांना तुरुंगात डांबले होते. 1 जुलै रोजी लागू या कायद्याच्या अंतर्गत आतापर्यंत किमान 1000 लोकांना अटक करण्यात आली आहे. एक देश, दोन व्यवस्थेच्या नावाने जगाची दिशाभूल करणारा चीन आता पूर्णपणे हाँगकाँगवर नियंत्रण मिळवू पाहत आहे.
लोकशाहीचे आंदोलन संपविण्याची इच्छा या कायद्याला अनेक तज्ञांनी हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक आंदोलनाची अखेर म्हटले आहे. हाँगकाँगमध्ये निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची यादी आता बीजिंगमधूनच अंतिम स्वरुप घेणार आहे. हाँगकाँगच्या विधान परिषदेत निवडला जाणारा प्रत्येक सदस्य चीनच्या इशाऱयावर काम करणार आहे. हाँगकाँग हे शहर ब्रिटिश शासनाकडून चीनच्या हातात 1997 मध्ये ‘एक देश, दोन व्यवस्था’ तत्वांतर्गत आले होते.









