अहमदाबाद / वृत्तसंस्था
आगामी टी-20 मालिकेत हार्दिक पंडय़ाने गोलंदाजीतही भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा भारतीय उपकर्णधार रोहित शर्माने बुधवारी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली. भारत-इंग्लंड यांच्यात उद्या (शुक्रवार दि. 12) पहिली टी-20 लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित बोलत होता.
हार्दिक पंडय़ाला ऑक्टोबर 2019 मध्ये पाठीची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यानंतर गतवर्षी त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. पण, गोलंदाजी केली नाही. या अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियात मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत फलंदाजीच्या माध्यमातून संघाला काही सामने जिंकून दिले. मात्र, 3 वनडे व 3 टी-20 सामन्यात त्याने केवळ एकदाच गोलंदाजी केली होती.
अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान तो संघासमवेत होता आणि आता मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेत जबाबदारी स्वीकारण्यासाठी तो पूर्ण सज्ज असेल, अशी रोहितला आशा आहे.
‘हार्दिक पंडय़ा संघातील महत्त्वाचा घटक आहे. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर तो बरीच मेहनत घेत आहे. या दीड महिन्यात संघासमवेत असताना त्याने कसून सराव केला. आता तो संघाच्या अपेक्षांना खरा उतरेल, अशी अपेक्षा आहे’, असे रोहित पुढे म्हणाला. टी-20 संघात पुनरागमन करत असलेल्या रिषभ पंतकडूनही रोहितने भरीव योगदानाची अपेक्षा नोंदवली. ‘मजबुतीकडून मजबुतीकडे, असा रिषभचा प्रवास होऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलियन भूमीत आणि आता मायदेशात इंग्लंडविरुद्ध लक्षवेधी खेळ साकारला आहे. त्याला खेळातील विविध परिस्थितींची उत्तम जाण आहे आणि आवश्यकतेनुसार खेळात लवचिक बदल करण्याची त्याची क्षमता आहे’, याचा रोहितने येथे उल्लेख केला.









