वृत्तसंस्था/ अँटवर्प
भारताच्या पुरूष हॉकी संघाने युरोपच्या दौऱयावर शेवटपर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. या दौऱयातील सोमवारी झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने ब्रिटनचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात मनदीप सिंगने दोन गोल केले.
युरोप दौऱयातील सोमवारच्या शेवटच्या सामन्यात हरमनप्रित सिंगने पहिल्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. हुकमी स्ट्रायकर मनदीप सिंगने 28 व्या आणि 59 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. ब्रिटनतर्फे जेम्स गॉलने 20 व्या मिनिटाला तर ऍडॅम फोर्सेटने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या दौऱयातील पहिला सामना भारताने 1-1 असा बरोबरीत राखला होता. भारताने जर्मनीविरूद्धच्या पहिल्या सामन्यात 6-1 अशा गोलफरकाने विजय मिळविला होता. त्यानंतर या दौऱयातील जर्मनीबरोबरचा दुसरा सामना 1-1 असा अनिर्णित राखला होता. भारतीय पुरूष संघाची या दौऱयावरील कामगिरी समाधानकारक झाल्याची प्रतिक्रिया कर्णधार पी.आर. श्रीजेशने व्यक्त केली आहे.









