मनपा राबविणार ओल्या कचऱयापासून वीज प्रकल्प
प्रतिनिधी / बेळगाव
एपीएमसीमधील ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्यावतीने बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यापासून वीज निर्मितीचा प्रस्ताव असून, प्रकल्प राबविण्याकरिता निविदा मागविल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी सहभाग घेतला आहे. कंत्राटदार पात्र झाल्यास हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे. मात्र, याकरिता जागेची समस्या निर्माण झाल्याने हा प्रस्ताव कित्येक वर्षांपासून धूळखात पडला होता. या प्रकल्पासाठी महापालिकेने बरेच प्रयत्न केले. पण नगरविकास खात्याकडून हिरवा कंदील मिळाला नव्हता. मात्र, अलीकडेच या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली असल्याने 5 टन कचऱयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एपीएमसीमध्ये भाजीमार्केट स्थलांतर करण्यात आल्याने या ठिकाणी ओला कचरा मोठय़ा प्रमाणात साचत आहे. येथील कचरा तुरमुरी कचरा डेपो येथे नेण्यात येतो. सध्या दररोज अडीचशे टनहून अधिक कचरा जमा होत असल्याने कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी तुरमुरी डेपो येथील यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिकेने कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी 1 कोटी 30 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा मागविल्या होत्या. निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी सहभाग घेतल्याने चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
ओल्या कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी श्रीनगर येथील जागेत कचऱयापासून खत निर्मितीचा प्रकल्पही सुरू केला आहे. ओल्या कचऱयाच्या माध्यमातून बायोगॅसपासून वीजनिर्मिती करून त्या विजेचा उपयोग पथदीपांसाठी करण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर लहान क्षमतेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याकरिता मागविलेल्या निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी सहभाग घेतला आहे. निविदेचे मूल्यांकन करण्यात येत असून, निविदा प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर पात्र कंत्राटदाराला काम देण्यात येणार आहे.









